
दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२३ । सातारा । जन्म व मृत्यू घटनांच्या नोंदणीसाठी विविध प्रसार माध्यमातून समाजकंटकाद्वारे फसवी बनावट संकेतस्थळे तयार करण्यात आली आहेत. यापैकी काही संकेतस्थळे CRSORGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATHONLINE.COM या नावाची आहेत. अशा फसव्या संकेतस्थळावरुन जन्म व मृत्यू घटनांच्या नोंदणी करु नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू, जिल्हा परिषद, सातारा यांनी केले आहे.
ही संकेतस्थळे भारत सरकारच्या अधिकृत मूळ संकेतस्थळाची नक्कल करुन तयार करण्यात आली असून ती भारत सरकारच्या अधिकृत मूळ संकेत स्थळासारखीच आहेत. यावरुन जन्म/मृत्यू प्रमाणपत्रे देखील तयार होतात. त्यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन फोनवरुन मागणी करुन रक्कम घेतली जाते. नागरिकांनी या संकेतस्थळावरुन कोणत्याही प्रकारे घटनांची नोंदणी करुन नये अथवा ऑनलाईन रक्कम भरु नये.
जन्म व मृत्यू घटनांची नोदंणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, शहरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद अथवा नगरपंचायत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, कार्यकारी अधिकारी, कटक मंडळे (कॅन्टोनमेन्ट बोर्ड), शासकीय आरोग्य संस्थेचे प्रमुख (जर घटना शासकीय आरोग्य संस्थेत घडली असेल तर) यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.