नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयामध्ये आज महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वक्त्यांचे स्थान देण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाचे मार्गदर्शक डॉ. उदय जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी महापुरूषांच्या जयंतीचे औचित्य स्पष्ट केले. तसेच आजचा युवक व महापुरूषांच्या विचारधारा यांची तुलना करून महात्मा फुले यांचे प्रेरणादायी कार्य स्पष्ट केले.

यानंतर उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे कार्य व गौरव याबद्दल आपली प्रेरणादायी भाषणे व्यक्त केली. यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बी. ए. भाग ‘ख’ चे विद्यार्थी श्री. सुजल डोईफोडे, श्री. यशराज नामदास, कु. सुहानी खरात, कु. साक्षी खरात तसेच कु. नेहा शिंदे या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणे सादर केली. ज्यामध्ये त्यांनी महात्मा फुले यांचा जीवन परिचय, सामाजिक व शैक्षणिक कार्य, देशप्रेम, बहुजन उद्धार व आजच्या युवकाचे कर्तव्य याविषयी बहुमोल विचार व्यक्त केले.

यानंतर महाविद्यालयाच्या प्रा. कु. वनिता कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्यामध्ये त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन परिचयाबरोबरच राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच महात्मा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी कोणी व केव्हा दिली, हेही सांगितले. महात्मा फुले यांचे कार्य आजही प्रासंगिक असून आजच्या युवा वर्गाने त्यांच्या विचाराचे व कार्याचे अनुकरण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. दीपक राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना सांगितले की, आज मूर्त्यांचे पूजन व विचारांचे दहन होत आहे. खरे तर महात्मा फुले यांचे कार्य केवळ वंदनीय नाही तर ते अनुकरणीय आहे. म्हणूनच अशा महापुरूषांच्या जयंती आपण डॉल्बीवर नाचून साजर्‍या न करता त्यांचे आत्मचरित्र वाचून आणि आचार व विचार आत्मसात करून समाज व राष्ट्रविकास कार्यास हातभार लावून साजर्‍या केल्या पाहिजेत. हीच खर्‍या अर्थाने त्यांच्या प्रति आदरांजली जयंती ठरेल. आजच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशी जयंती साजरी करण्याची गरज आहे. त्यानंतर त्यांनी भाषण सादर करणार्‍या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना ’वक्ता’ म्हणून स्थान देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय स्टाफच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. आरती शिंदे, प्रास्ताविक महाविद्यालयाचे मार्गदर्शक डॉ. उदय जाधव, स्वागत सत्काराचे कार्य प्रा. एम. बी. तुपे व आभार प्रदर्शनाचे कार्य प्रा. डॉ. संदेश बिचुकले यांनी केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून भाषणांना प्रतिसाद दिला व कार्यक्रमाची शोभा वाढविली.


Back to top button
Don`t copy text!