साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य , सातारा , दि .२६: पुणे-बेंगलोर महामार्गालगत असलेल्या पोलीस दलाच्या तीस एकर जागेवर सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन व क्रेडाईच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान उभे राहत आहे. हे उद्यान राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास सह्याद्री देवराई संस्थेचे प्रणेते तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सह्याद्री देवराईचे विजयकुमार निंबाळकर,  मधूकर फल्ले, क्रेडाईचे अध्यक्ष जयंत ठक्कर, सागर साळुंखे, कमलेश पिसाळ आदी उपस्थित होते.
सयाजी शिंदे म्हणाले, वृक्षलागवड व संवर्धन मोहीमेत अग्रेसर असलेल्या ‘देवराई’च्या वतीने दरवर्षी फेव्रुवारी महिन्यात वृक्ष संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे हे संमेलन ऑक्टोबर महिन्यात होईल. वृक्षचळवळ मोहीम बळकट व्हावी, यामध्ये तरूणांचा, महाविद्यालयांचा सहभाग वाढवा यासाठी प्रथमच निसर्गराजा व निसर्गराणी पुरस्कार देण्याचे देवराईचे नियोजन आहे. संबंधितांनी किती व कोणती झाडे लावली, किती झाडे जगविली याची पाहणी करून प्रत्येकी दहा-दहा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. महाविद्यालयात ज्या पद्धतीने क्रीडा स्पर्धा भरतात, त्याच धर्तीवर वृक्ष लागवड स्पर्धेचे आयोजन केले जाईल.
हे करत असतानाच पुणे-बेंगलोर महामार्गालगत जैवविविधता उद्यान साकारण्याचा देवराईचा मनोदय आहे. या उद्यानासाठी पोलीस दलाने गोळीबार मैदानाची तीस एकर जागा देऊ केली आहे. या जागेवर देशातील सर्व भारतीय वृक्षांची लागवड केली जाईल. सुवासिक वनस्पती, गवताच्या प्रजाती, राज्य वृक्ष व राज्य फूल, दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या वनस्पती आदींची लागवड करून शेततळी, पाझर तलावाची निर्मितीही केली जाणार आहे. या कामास प्रारंभ झाला असून, यासाठी पोलीस दल व क्रेडाई संस्थेचे मोठे सहकार्य मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही काटेसावर महोत्सव साजरा केला जाणार असून, यावेळी तो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे होणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!