दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण ग्रामीण पोलिसांनी आत्तापर्यंतचे सर्वात मोठे गोधन जप्त केले आहे. त्यामध्ये एकूण ७ गुन्हे उघडकीस आणून ३३ लाख ५० हजार रुपये किमतीचे गोधन जप्त करून एकूण तिघांना अटक केली आहे. फलटण पोलिसांची ही दमदार कामगिरी अभिनंदनास पात्र ठरली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वात फलटण ग्रामीण पोलीस सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत.
दरम्यान, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जर्सी गाई चोरीच्या गुन्ह्यांनी डोके वर काढले होते. जर्सी गाईच्या चोरीच्या या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार्या जर्सी गाईंच्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उघड करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. या विशेष पथकाने वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने गोपनीय माहिती आधारे आरोपी विनोद निवृत्ती खरात (रा. भांडवली, ता. माण), संतोष शामराव सोनटक्के (रा. भांडवली, ता. माण) व सतीश रमेश माने (रा. तोंडले, ता. माण) या तिघांना शीताफीने पकडले आहे.
त्यांच्याकडे वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी, औंध पोलीस स्टेशन, मेढा पोलीस स्टेशन, लोणंद पोलीस स्टेशन या ठिकाणी अशा एकूण ७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार विविध गुन्ह्यांतील सुमारे ३३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या त्यामध्ये ९ जर्सी गाई, २ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरू असून अटक आरोपींकडून व तिघा फरारी आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरीत पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, प्रमोद दीक्षित, पोलीस उपनिरीक्षक, सहा. पोलीस फौजदार राऊत, पो.ना. अभिजित काशिद, पो.ना. अमोल जगदाळे, पो.कॉ. महेश जगदाळे, विक्रम कुंभार यांनी भाग घेतला आहे.