स्थैर्य, मुंबई, दि. २: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात
घेऊन खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा आणखी तीन महिने राखीव ठेवण्यात
येणार आहे. यासंदर्भात सोमवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप
व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली असल्याचे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्य शासनाच्या या
आदेशानुसार खासगी रुग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार
करणे बंधनकारक असणार आहे.
मेस्मा,
आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरिटेबल
ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सिंग होम कायद्यांतील तरतुदीच्या अनुषंगाने खासगी
रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार
आहे. यासोबतच कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या
दरावर देखील नियंत्रण राहील, असे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, सुधारित अधिसूचनेमधील दरसूचीत रुग्णाला वापरण्यात आलेल्या
ऑक्सिजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयांना
ऑक्सिजनसाठी स्वतंत्र रक्कम आकारता येणार नाही. खासगी रुग्णालये कोरोनाच्या
रुग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करीत होते. शासन आदेशानुसार खासगी
रुग्णालयांना या अधिसूचनेत जे दर निश्चित करून दिले आहेत त्याप्रमाणेच
आकारणी करावी लागणार आहे.