स्थैर्य, दि.१२: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाची लागण झाली आहे. थायलंड ओपन खेळण्यासाठी गेलेली सायना सोमवारी तिसऱ्या फेरीच्या चाचणीनंतर पॉझिटिव्ह आढळली. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (BAI)ने याची पुष्टी केली आहे. तिच्याशिवाय एचएस प्रणयला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
सायनाचे पती आणि शटलर परुपल्ली कश्यप यांनाही आयसोलेट होण्यास सांगितले आहे. ते देखील स्पर्धेसाठी बँकॉकमध्ये आहे. BAI नुसार तिन्ही खेळाडूंची नावे थायलंड ओपन स्पर्धेतून मागे घेतली आहे. पुढील 10 दिवस ते रुग्णालयात आयसोलेट राहतील. यामुळे भारताच्या ऑलिम्पिकच्या तयारीलाही धक्का बसला आहे.
सायना आणि कश्यपच्या प्रतिस्पर्ध्यांना वाकओव्हर मिळाला
सायना मंगळवारी आपला पहिला सामना स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळणार होती. मात्र, सायना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मलेशियाची खेळाडू किसोना सेल्वदुरे हिला वॉकओव्हर देण्यात आला. किसोना दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे. यासोबतच पी कश्यपचाही पहिला सामना कॅनडाच्या जेसन अँथनी हो-शुए सोबत होणार होता. जेसनलाही वॉकओव्हर मिळाला आणि तो देखील पुढील फेरीत गेला.
सायना BWF वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळणे अशक्य
ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी सायना आणि प्रणयचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. थायलंड ओपन स्पर्धा 12 ते 17 जानेवारी दरम्यान बँकॉकमध्ये खेळली जात आहे. यानंतर, टोयोटा थायलंड ओपन 19 जानेवारीपासून सुरू होईल आणि 24 जानेवारीपर्यंत चालतील. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) ची वर्ल्ड टूर फायनल्स 27 ते 31 जानेवारी दरम्यान खेळली जाणार आहे. 10 दिवस आयसोलेटमध्ये असलेल्या सायना आणि प्रणय यांना वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळणे जवळजवळ अशक्य आहे.