दैनिक स्थैर्य | दि. 17 जानेवारी 2024 | फलटण | राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यामध्ये निरा – देवधर, फलटण – बारामती रेल्वे व नाईकबोंबवाडी MIDC या प्रकल्पांचा समावेश आहे. फलटण येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मैदानावर दुपारी 2 वाजता वचनपुर्ती सोहळा संपन्न होणार आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे निरा – देवधर प्रकल्प आहे. निरा – देवधर प्रकल्पामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस व सांगोला हे तालुके दुष्काळ मुक्त होणार आहे व हजारो हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे.
यासोबतच माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेला प्रकल्प म्हणजे “फलटण रेल्वे”. रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी फलटण ते लोणंद अशी रेल्वे सुरू करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. त्यानंतर खासदार रणजितसिंह यांनी फलटण ते पुणे व पुणे ते फलटण अशी सुद्धा रेल्वे सेवा सुरू केली. आता आज फलटण ते बारामती ह्या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्प झाल्याने दक्षिण भारत हा थेट पश्चिम महाराष्ट्राच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. आगामी काळामध्ये फलटण – बारामती व फलटण – पंढरपूर रेल्वे झाल्याने फलटण हे नक्कीच रेल्वेचे जंक्शन होईल; यात कसलीही शंका नाही.
फलटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा प्रकल्प म्हणजे “नाईकबोंबवाडी MIDC” या प्रकल्पाचे भूमिपूजन आज संपन्न होणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नाईकबोंबवाडी MIDC साठी जे प्रयत्न केले आहेत; ते संपूर्ण फलटण तालुक्याला श्रुत आहेत. यामध्ये जेंव्हा नाईकबोंबवाडी MIDC प्रकल्प प्रस्तावित केला होता; तेंव्हा हा प्रकल्प होणेच शक्य नाही; नाईकबोंबवाडी MIDC होणे म्हणजे आठवे आचार्य आहे; असे सूर उमटत होते. परंतु उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नाईकबोंबवाडी MIDC प्रकल्प सुद्धा पूर्णतः मार्गी लागला असून त्याचे आज भूमिपूजन संपन्न होत आहे.