दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । मुंबई । वडाळा येथील जीएसटी भवन या इमारतीचा भूमीपूजन समारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवार दि. ०२ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सीटीएस ६, वडाळा सॉल्ट पॅन, शिवडी चेंबुर रोड, वडाळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात, नगर विकासमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) श्री. एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री, मुंबई शहर श्री. अस्लम शेख, पर्यावरण मंत्री, तथा मुंबई उपनगर पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, वित्त, राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), श्री. शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे, खासदार श्री. राहुल रमेश शेवाळे, आमदार श्री. कॅ. आर. तमिल सेल्वन, मुख्य सचिव, श्री. मनुकुमार श्रीवास्तव हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नियोजित नवीन जीएसटी भवन इमारत २२ मजल्यांची असून , या इमारतीमध्ये एकाच वेळी ८००० पेक्षा अधिक कर्मचारी काम करू शकतील व १६०० पेक्षा अधिक लोक एकाच वेळी कार्यालयास भेट देऊ शकतील. या व्यतिरिक्त, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची इतर काही कार्यालये व निवासी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच अधिकारी-कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण केंद्रही येथे असणार आहे.
राष्ट्राच्या सर्वांगीण , विशेषतः आर्थिक जडणघडणींमध्ये महाराष्ट्राचे अमूल्य योगदान नेहमीच राहिले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत जीडीपी व करसंकलनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे. देशाच्या जीडीपीत राज्याचा हिस्सा १३.९% आहे. राज्याच्या आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असलेल्या राज्यकर विभागाने राज्याच्या विकासात मोलाची भूमिका कायम बजावलेली आहे . राज्याच्या कराद्वारे मिळणाऱ्या एकूण महसुलात राज्यकर विभागाचा वाटा ६५% च्या जवळपास राहिला आहे. २०१७-१८ मध्ये देशाच्या जीएसटी करसंकलनात राज्याचा हिस्सा १४.२०% होता तो सध्या वाढून १४.७० % इतका झाला आहे . सन २०२१-२२ मध्ये फेब्रुवारीपर्यंत देशाचे एकूण जीएसटी करसंकलन ९,९५,५६२ कोटी असून मागील वर्षाच्या तुलनेत २९% वाढ साध्य झाली आहे . याच काळात महाराष्ट्र राज्याच्या जीएसटी करसंकलनातील वाढ ३३% असून आत्तापर्यंतचे एकूण करसंकलन २,१७,५८९ कोटी झाले आहे .