
भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने नोव्हेंबरपासून ऊसबिले जमा न केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मार्चअखेरमुळे शेतकऱ्यांपुढे देणी भागवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थैर्य, भुईंज, दि. ३० मार्च : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याने नोव्हेंबर महिन्यापासून ऊसबिले अद्याप जमा केलेली नाहीत. यामुळे मार्चअखेरच्या तोंडावर ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्यापुढे विविध प्रकारची देणी भागवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
चार महिन्यांपासून पैसे रखडले
जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरूनही या हंगामात कारखान्यासाठी ऊस आला आहे. चालू हंगामात किसन वीर कारखान्याने ४.५३ लाख मेट्रिक टन आणि भागीदारी तत्त्वावरील खंडाळा कारखान्याने २.४५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. नियमानुसार गाळपास आलेल्या उसाचे बिल चौदा दिवसांत एकरकमी देणे बंधनकारक असते. मात्र, कारखान्याने केवळ नोव्हेंबरपर्यंतचीच बिले दिली असून, गेली चार महिने शेतकऱ्यांचे पैसे रखडल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट
सध्या मार्च महिना संपत आल्याने शेतकऱ्यांना सोसायट्यांचे पीककर्ज भरावे लागते. याशिवाय खत दुकानदार, ट्रॅक्टर मालक आणि मजुरांची देणीही द्यावी लागतात. ऊस खोडव्याची मशागत आणि नवीन लागणीची कामे ऊसबिलाच्या भरवशावरच केली जातात. मात्र, हातात पैसेच न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
“शासनाकडून कारखान्याला कोणतीही उचल मिळत नसल्याने केंद्र शासनाच्या कोट्यानुसार साखर विक्री करून त्यातून देणी भागवावी लागत आहेत. मे महिन्याअखेरपर्यंत सर्व ऊस उत्पादकांची बिले जमा करण्याचे धोरण असून, पुढील वर्षापासून कारखाना मूळपदावर येईल.”
– जितेंद्र रणवरे, कार्यकारी संचालक, किसन वीर कारखाना.

