दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । नागपूर । व्यापारी संकुले, जुनी वस्ती, रेल्वे क्रॉसिंग तसेच काळाच्या ओघात अतिक्रमणामुळे निमुळते झालेले रस्ते व त्यातून दररोज उद्भवणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य नागपूरची लाईफलाईन ठरू पाहणाऱ्या एक हजार कोटीच्या उड्डाणपुलाचे आज भूमिपूजन केले. पुढील तीन वर्षात हा 9 कि.मी. लांबीचा उड्डाणपूल पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा उभय नेत्यांनी आज गोळीबार चौक व सक्करदरा चौक येथील जाहीर सभांमध्ये केली.
मध्य नागपूरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-डी वरील इंदोरा चौक ते दिघोरी चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन उभय नेत्यांनी या परिसरातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आज केले. या दोन प्रमुख सभांसोबतच रामझुला ते एलआयसी चौक आणि रिझर्व बँक चौक पर्यंतच्या वाय आकाराच्या उड्डाणपूलाचे आणि नवीन लोहापूल भूयारी मार्गाचे लोकार्पणदेखील त्यांनी केले.
या ठिक-ठिकाणच्या कार्यक्रमांना खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, कृष्णा खोपडे, माजी खासदार विकास महात्मे, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रशांत खोडस्कर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामार्ग विभागाचे आशिष अस्थी, नरेश वडेटवार, डॉ. अरविंद काळे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की मध्य नागपूरचा चेहरामोहरा बदलवणारा इंदोरा चौक ते दिघोरी चौकापर्यतचा प्रस्तावित सर्वात लांब उड्डाणपूल या भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात भारतातील सर्वात सुंदर शहर म्हणून नागपूर उदयास येत आहे. या उड्डाणपुलाची निर्मिती करताना कोणाचीही जमीन जाणार नाही. मात्र क्वचित काही ठिकाणी घरे ताब्यात घ्यावी लागली तर राज्य शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणे भरपूर मोबदला देण्यात येईल. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीतून नागपूर शहराला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
नागपूर शहरात गेल्या काही वर्षात अमुलाग्र बदल होत असून नुकत्याच झालेल्या जी-20 परिषदेतील उपस्थित विदेशी पाहुण्यांनी देखील नागपूर हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय शहरापेक्षा उजवे असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नागपूर शहरातील पायाभूत सुविधांसोबतच मेयो व मेडीकल येथील आरोग्याच्या सुविधा वाढविण्यात येणार आहे. मेयो हॉस्पिटलला ३५० कोटी तर मेडिकलला ४०० कोटी देण्यात येतील. लवकरच शताब्दी चौक ते म्हाळगी नगर चौक उड्डाणपूल उभारणी करण्यात येणार असून शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे करून हे शहर खड्डेमुक्त करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येथील पोलीस वसाहतीचे पार्कींग प्लॉझासह पुननिर्माण, चिटणीस पार्क येथे पार्कींगसह अत्याधुनिक क्रीडा संकुल, आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र व गांधी सागरचे कामाला गती, तसेच इंटिग्रेटेड ट्राफीक कंन्ट्रोल सिस्टीम सुरू करण्यात येणार असून अर्थसंकल्पात मोठया प्रमाणात नागपूरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित करताना स्पष्ट केले की, पुढील 50 वर्षात नागपूर शहरात एकही खड्डा पडणार नाही. संपुर्ण शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे असतील. मात्र नागपूरचे हिरवेपण कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही. मध्य नागपूरच्या वाहतूक कोंडी संदर्भात अनेक तक्रारी होत्या. आमदार मोहन मते, आ. विकास कुंभारे यांच्यासह अनेक सामान्य नागरिकांनी ही वाहतूक कोंडी फोडण्याचे आवाहन केले होते. या शहरातील गल्ली गल्लीचा अभ्यास असल्याने या ठिकाणी एका उड्डाणपूलाची आवश्यकता होती. या बांधकामासाठी मलेशियन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून वरचा बीम ‘स्टील फायबर’ मध्ये कास्ट होणार आहे, त्यामुळे उड्डाणपुलाची गुणवत्ता राखली जाईल. मधले पिल्लर कमी होतील. बांधकाम खर्चात कमी येईल. पारडीचा उड्डाणपूल तसेच कामठी येथील डबल डेकर पूलदेखील येत्या दोन महिन्यात करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर कमी झाले असून याच धर्तीवर नागपूर ते पुणे हे अंतर केवळ साडेचार तासात कापणे शक्य होईल असा एक महामार्ग आम्ही बांधतो आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यातील प्रकल्पांचे वैशिष्ट्य –
नऊ किलोमीटरचा उड्डाणपूल
इंदोरा चौक- पाचपावली-अग्रसेन चौक-अशोक चौक-दिघोरी चौक पर्यंतच्या दाट लोकवस्तीतून जाणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपूलाची लांबी 8.9 किमी तसेच या प्रकल्पातील सर्व्हिस रोडची लांबी 13.82 किमी राहणार आहे. या पूलाच्या बांधकामासाठी 998.27 कोटी रुपये मंजूरी देण्यात आली असून काम पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दोन लेन सह 12 मीटर रुंदीच्या या उड्डाणपुलाची रचना अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रीटने केली असून या प्रकल्पात दोन रेल्वे उड्डाणपुल आणि रेल्वे भुयारी मार्गाचा प्रस्ताव समाविष्ट करण्यात आला आहे. या भागात होणारी वारंवार वाहतूक कोंडी, अपघात, रेल्वे क्रॉसिंगवर जाम या समस्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाने सुटणार असून प्रवासाचा वेळ आणि इंधनाची सुद्धा बचत होणार आहे.
वायशेप उड्डाणपूल
रामझुला ते एलआयसी चौक आणि रिझर्व बँक चौक पर्यंतचा वाय आकारातील उड्डाणपूलावर रामझुलाकडून एकेरी वाहतूक राहणार आहे. तर रिझर्व बँक किंवा एलआयसी चौकाकडून रेल्वे स्थानक किंवा सि.ए. रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पुलाखालील रस्ता राहणार आहे. 935 मीटर लांब या उड्डाणपुलाच्या बांधकामाला 65 कोटी रुपये खर्च आला आहे.
नवीन लोहापूल
मानस चौक ते कॉटन मार्केट चौकाला जोडणारा 47 मीटर लांब भुयारी मार्ग असलेला नवीन लोहा पूल हा 25 कोटी रुपये खर्चातून दोन वर्षाच्या विक्रमी अल्प कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे. याची उंची 4.5 मीटर उंच आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी बॉक्स पुशिंग तंत्र आणि रेल क्लस्टर पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. येथे मानस चौक ते कॉटन मार्केट चौकापर्यंत ची वाहतूक नवीन लोहापूल मार्गे होईल तर कॉटन मार्केट चौक ते मानस चौकापर्यंत वाहनांचे येणे जाणे जुन्या लोहापूल मार्गे होईल.