दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
‘श्रीकांता कमलकांता….!’, ‘एक लिंबू झेलू….!’ अशी विविध गाणी गात, फेर धरत गुणवरे (ता. फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात पारंपरिक ‘भोंडला’ उत्साहात साजरा करण्यात आला.
अश्विन महिन्यात साजरा होत असलेल्या नवरात्रौत्सवानिमित्त या भोंडल्यात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील पारंपरिक सण-उत्सव यांचे महत्त्व समजण्यासाठी व दैनंदिन ताणतणावातून मुक्त होण्यासाठी महिला, सखी एकत्र येऊन अशा प्रकारचे सण साजरे करत असतात. भारतात साजरे होणारे सर्वच सण हे शेतीवर व निसर्गावर अवलंबून असतात. आपल्या शेतीप्रधान देशात सर्वजण हे सण उत्साहाने साजरे करत असतात.
असाच हा महिला शक्तीचा उत्सव, समृद्धी व शक्तीचे प्रतीक असलेल्या हस्त पूजनाने करण्यात आला. हस्तपूजन संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भोंडल्याची गाणी म्हणत, फेर धरत सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. बंद डब्यातील खाऊ ओळखणे, फुगडी असे पारंपरिक खेळही घेण्यात आले. सर्वांनी गाण्याच्या तालावर दांडिया नृत्य करत वातावरण उत्साहवर्धक केले.
संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे, अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे यांनी सर्वांना नवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या. शाळेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे, उपप्राचार्या शितल फडतरे, सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी उत्तम प्रकारे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.