दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२२ । दौंड । साहित्याची मूळ बीजे ग्रामीण भागात असून गावागावातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती शब्दबद्ध करून भीमथडीच्या सांस्कृतिक इतिहासाचे जतन व्हावे. असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांनी केले. मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित पहिले राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दौंड तालुक्यातील चौफुला बोरमलनाथ मंदिर येथे (दि.१७ व १८) जून रोजी उत्साहात संपन्न झाले यावेळी संमेलन अध्यक्ष पदावरून श्री यादव बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे तेरावे वंशज युवराज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष राजाभाऊ तांबे, निमंत्रक तानाजी केकाण, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा किसन मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, अभिनेते रमाकांत सुतार, सूरज पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, पोलीस निरीक्षक नारायण पवार, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डाडर यासह आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी यादव बोलताना म्हणाले, दौंड तालुक्याची भूमी भीमा नदीच्या पाण्यामुळे हिरवीगार असली तरी भीमथडीच्या तटावर साहित्याचा मळा फुलवण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे. कविता,कथा,गीत,पोवाडे, नाटक, लावणी, कादंबरी सारख्या साहित्यांचा महापूर भीमथडीवर यावा त्यातून समाज सशक्त होईल. अटकेपार दौड करणार्या घोड्यांची पैदास या परिसरात होत होती. हेच घोडे छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईत वापरले होते. साहित्याचा मूळ गाभा ग्रामीण भागात शेण मातीत आहे, तो शोधण्याची गरज आहे. संमेलनाचे उद्घाटक युवराज संभाजीराजे म्हणाले, मराठी साहित्यांचा महाराष्ट्राचा वारसा तंजावर तामिळनाडू येथे जपला जातो. सरफोजी राजे यांनी भरत नाट्यम या नृत्य प्रकारचा शोध लावला. मराठी भाषेचा प्रचार प्रसार करताना सांस्कृतिक परंपराची देवाण घेवाण होत असते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा नवीन पिढीने घ्यावा आणि साहित्य निर्मिती करावी असे ते म्हणाले. यावेळी स्वागताध्यक्ष राजाभाऊ तांबे यांनी भीमथडी साहित्य संमेलन दरवर्षी भरवण्याचे अश्वासन दिले. यावेळी अभिनेते सुरज पवार, रमाकांत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिग्विजय जेधे, डॉ. अशोक जाधव, संजय सोनवणे,दिपक पवार, रवींद्र खोरकर, कैलास शेलार, रामचंद्र नातू, सचिन रुपनवर, बाळासाहेब मुळीक, संजय गायकवाड, हरीभाऊ बळी, सुशांत जगताप, आनंदा बारवकर, विनायक कांबळे, सचिन आटोळे चंद्रकांत अहिरकर, सुमित रणधीर, विनोद गायकवाड, सुमित सोनवणे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.