दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२४ | फलटण | आगामी होणारी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून स्वतः निवडणूक लढवणार असलेल्या लोकसभा मतदारसंघावर निरीक्षक नेमले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभा निरीक्षक तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. भागवत कराड व आमदार प्रसाद लाड यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा प्राथमिक आढावा बैठकीद्वारे घेतला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्वजण कार्यरत रहावे; असे निर्देश माढा लोकसभा निरीक्षक तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. भागवत कराड व आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महायुतीने सोडला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणतेही निरीक्षक नेमले नाहीत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा लोकसभा हा भारतीय जनता पार्टीकडे देणार व माढा लोकसभा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे घेणार अश्या विविध चर्चा सुरु होत्या. परंतु माढा लोकसभा मतदारसंघावर लोकसभा निरीक्षक नेमून भारतीय जनता पार्टी आगामी माढा लोकसभा ताकदीने लढवणार असल्याचे जवळपास स्पष्ट केले आहे.
खासदार रणजितसिंह व धैयशील मोहिते – पाटील यांच्यात तिकिटासाठी चढाओढ
माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा आगामी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची सुद्धा पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे. यासोबतच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते – पाटील हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आगामी माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत त्यांनी तर गेल्या काही वर्षांपासून तयारी सुरु केली आहे. यासोबतच धैर्यशील मोहिते – पाटील यांच्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांनी सुद्धा कंबर कसली आहे. अगदी मतदारसंघापासून ते विधिमंडळापर्यंत ते गाठीभेटी घेत आहेत. भारतीय जनता पार्टी आगामी लोकसभेची उमेदवारी नक्की कुणाला देते ? यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.