भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । मुंबई । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचं संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी वेचलं. समाजातून विषमता नष्ट व्हावी, समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी; प्रत्येकाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा, यासाठी डॉ.बाबासाहेबांनी लढा दिला.

भारतीय असलेली प्रत्येक स्त्री आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहे, याचे श्रेय आपल्या संविधानाला व पर्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. प्रचंड स्त्रीवादी असलेले डॉ. बाबासाहेब हे स्त्रीमुक्तीचे आणि स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते होते. डॉ. बाबासाहेबांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांचीदेखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थीदशेतच आले होते.

स्वतंत्र भारताचे पहिले कामगार मंत्री म्हणून सुद्धा बाबासाहेबांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे अनेक निर्णय घेतले होते. केवळ निर्णय नाही तर त्यांची अंमलबजावणी सुद्धा त्यांनी केली. खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी 21 दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि 20 वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करता येईल.

जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था त्यांनी देशाला दिली. स्वातंत्र्यानंतरची सत्तर वर्षे आपला देश अखंड, एकसंध, सार्वभौम राहिला, लोकशाही दिवसेंदिवस मजबूत होत गेली, याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना, दूरदृष्टीला आहे. डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानावर आमची दृढ श्रद्धा आहे. त्याच माध्यमातून देशाची आणि देशवासियांची प्रगती होईल, असा आमचा विश्वास आहे.” अशा शब्दात महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे व विचारांचे स्मरण करुन त्यांच्या 131 व्या जयंती दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!