स्थैर्य, फलटण, दि.११: फलटण कडून आसू कडे ग्राहकांना गॅस पुरवठा करण्यासाठी निघालेला भारत गॅस ट्रकची गाडी गोखळी पाटी ता. फलटण येथे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये पलटी झाली. भारत गॅस गॅस सिलेंडर एकमेकांना बांधल्यामुळे ते पुराच्या पाण्यात वाहून गेले नाहीत व कोणतीही जीवित हानी झालेली नाही. चालकास बरोबर असलेल्या वाहकास गोखळी पाटी येथील युवकांनी सुखरूप बाहेर काढले.
या बाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार भारत गॅस कंपनीचा MH 11 AL 0632 ट्रक फलटणमधून आसू कडे ग्राहकांना गॅस सिलेंडर पोहचवण्यासाठी निघालेला होता. गोखळी पाटी येथे ओढ्यास पूर येऊन पाणी पुलाच्या वरून चालले होते. ट्रक पुलाच्या मध्यभागी आल्यावर पुराच्या पाण्याच्या ओढीने ट्रक ओढ्यात वाहत गेला व तेथे पलटी झाला. ट्रक चालक संकपाळ यांनी प्रसंगावधान राखल्याने नुकसान टळले, सदर घटना काल दि.10 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास गोखळी पाटी येथे घडली.
सदरील ट्रकमध्ये 350 भारत गॅस कंपनीचे सिलेंडर होते. ट्रक मध्ये सर्व सिलेंडर साखळी मध्ये लॅाक केलेले होते. गॅस सिलेंडर इतरत्र वाहुन गेले नाहीत. ट्रक चालक संकपाळ यांना युवकांनी सुखरूप बाहेर काढले. ओढ्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली होती. ओढ्याच्या दोन्ही बाजूच्या शेतातील पिकांचे नुकसान तसेच गोखळी पाटी येथील दुकानात पाणी घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.