भग्न बलकवडी बोलायला लागली…


वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जोर खोर्‍यात कृष्णा नदीवर बलकवडी हे धरण बांधलेले असून धरणाचा एकूण पाणीसाठा हा ४ टी.एम.सी. इतका आहे. धरणाच्या फुगवट्यामुळे तिथल्या गावांना मूळ जागेपासून विस्थापित व्हावं लागलं. गेल्या वर्षी महाराष्ट्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. त्यात सर्व धरणांतील पाणीसाठा घटला आणि धरणं कोरडी ठक्क पडली. त्यामुळे धरणातील पुरातन अवशेष उघडे झाले. बलकवडी धरणात तब्बल २४ वर्षांनी शिवकाळातील दोन मंदिरे पाहण्यासाठी खुली झाली आहेत.

त्यातील पहिलं म्हणजे…
श्री धुरेश्वर मंदिर (धुर्जटलिंग), गोळेगाव
व दुसरे मंदिर
श्री गोकर्णेश्वर मंदिर, गोळेवाडी.

तीन वर्षांपूर्वी मी आणि सौरभ या मंदिरांच्या शोधात जोर खोर्‍यात गेलो होतो; परंतु धरणाचा पाणीसाठा जास्त असल्याने धुरेश्वरचा कळस फक्त दिसत होता. यंदा धरणात फक्त मृत पाणीसाठा राहिल्यामुळे धरण संपूर्ण कोरड पडलं आणि ही दोन मंदिरे पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली.

श्री धुरेश्वर मंदिर (धुर्जटलिंग), गोळेगाव :

क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा मंदिरातून कृष्णा नदीचा उगम होतो. तिथून कृष्णा नदी गुप्त होऊन कृष्णाई मंदिरात प्रकटते. तिथून ती कड्यावरून धाव घेऊन खाली धुरेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा जोरकडून वाहत येणार्‍या वेदगंगा नदीशी संगम होतो. या ठिकाणाचा स्कंदपुराणातील कृष्णा महात्म्यात अध्याय क्रमांक ४ मध्ये संदर्भ आलेला आहे. तो असा, .

पुढे वाहता कृष्णा ऐसी ॥ वेदनद करी संग तिशी ॥
जो का निघाला उत्तरेसी ॥ वेदगिरीच्या ॥
जेथे कृष्णावेदसंग तिथे असे धुर्जटलिंग ॥
जयाचेनि दर्शन चतुर्वर्ग ॥ फल भर्गकृपेने॥

विष्णूच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णूपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे. गोळेवाडीच्या पुढच्या बाजूला असणार्‍या ओहोळातून धरणात उतरल्यावर आपल्याला श्री धुरेश्वराचे मंदिर पहायला मिळते. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला दोन कळस आहेत. त्यातील सर्वात मोठा कळस गर्भगृहाचा आहे तर दुसरा हा सभामंडपाचा आहे. कळसाला पूर्वी चुन्याच्या गिलाव्याचे काम असावे. पण, बरेच वर्षे पाण्यात राहिल्यामुळे चुना निघून गेला असावा. पूर्व बाजूने छोट्या दरवाजातून मंदिरात प्रवेश केल्यावर आपण छोटेखानी सभामंडपात येतो. इथे डाव्या आणि उजव्या बाजूला वातायानासाठी दोन झरोके ठेवलेले दिसतात. दरवाजाच्या आतील बाजूस दोन चौकोनी देवकोष्ठके आहेत. त्यात मूर्ती बसवलेल्या नाहीत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मध्यभागी गणेशपट्टी असून बाजूला दोन कमळपुष्प कोरलेले आहेत. गर्भगृहात प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला वातायानासाठी दोन झरोके ठेवलेले आहे. शिवलिंगाच्या मागच्या बाजूस एक देवकोष्ठक असून तिथे लामनदिवा ठेवलेला आहे. मंदिराचे शिखर आतल्या बाजूने आयताकृती शिळा भौमितिक पद्धतीने रचून ठेवल्यामुळे विलोभनीय दिसते. गर्भगृहातील शिवपिंडीची शाळुंका चौकोनी असून लिंग रुद्राक्ष स्वरुपाचे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस नंदी असून त्याचे मुख भग्न झालेले आहे. मंदिराच्या उत्तर बाजूला दगडी चाक आहे. मंदिराचे स्थापत्य बघता मंदिराची निर्मिती १६-१७ व्या शतकातील शिवकाळ किंवा तद्नंतर झाली असावी, असे वाटते.

श्री गोकर्णेश्वर मंदिर, गोळेवाडी :

श्री धुरेश्वराचे (धुर्जटलिंग) दर्शन घेतल्यानंतर आम्ही गोकर्णेश्वर मंदिराकडे निघालो. गोळेवाडीतून गोळेगावकडे आलो. श्री कॅम्प रिसॉर्टच्या जवळून पायवाट धरणात उतरते. त्यावाटेने खाली जाऊन श्री गोकर्णेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. हे मंदिर धरणाच्या सखल भागात असून इथे भरपूर प्रमाणात गाळ साठलेला होता. याला रुद्रतीर्थ देखील म्हटले जाते. स्कंदपुराणातील कृष्णा महात्म्यात अध्याय क्रमांक ४ मध्ये गोकर्णेश्वरचा देखील उल्लेख आलेला आहे.

गंगाद्वाराचेनिकटी ॥ कृष्णानदी दक्षिणतटी ॥
चार सहस्त्र धनुष्कोटी ॥ गिरीपासाव गोकर्ण ॥
हे कृष्णागोकर्णाख्यान ॥ जो करी सकाळी नित्य पठण ॥
त्यासी शिवाचे संनिधान ॥ सायुज्य सदन मिळतसे ॥

हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या समोर तीन भग्न वीरगळ आणि दोन समाध्या आहेत. त्यातील एका समाधीच्या वर कासव कोरलेले असून त्यावर शिवपिंड आणि पादुका कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस नंदी असून त्यापुढे चौकोनी शिवपिंड ठेवलेली आहे. येथे असलेल्या भिंतीला विटांचे बांधकाम केलेले असून त्याला सिमेंटच्या गिलाव्याने हिंदू धार्मिक शुभ चिन्ह उठवलेली आहेत. मंदिराच्या बाह्य बाजूच्या भिंती पडू नये म्हणून, वीटांच्या चौकोनी स्तंभांनी आधार दिलेला आहे. मंदिराच्या शिखराला सिमेंटने गिलावा केलेला आहे. हे कामं सन १९७३ साली केलेले आहे. असे सिमेंटच्या गिलाव्यात उठवलेले दिसते, यावरून कळते. मंदिराला गर्भगृह आणि सभामंडप असून सभामंडपाच्या द्वारशाखेला कोरीव स्तंभ आणि वरच्या बाजूस गणेशपट्टी आहे. सभामंडपात प्रवेश केल्यावर आतील बाजूस अष्टकोनी महिरपी कमानींचे बांधकाम केलेले आहे. मराठा स्थापत्य शैलीमध्ये बर्‍याच ठिकाणी आपल्याला अष्टकोनी बांधकाम पहायला मिळते. गर्भगृह प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या देवकोष्ठकात विष्णूची केशवरूपातील सुरेख कोरीवकाम केलेली मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून शंख, चक्र, गदा, पद्म हातामध्ये धारण केलेले दिसते. मूर्तीच्या उजव्या पायापाशी गरुड देवता वाटत आहे आणि डाव्या पायापाशी चामर धारीणी अथवा अलसाकन्या असावी. पण, याबद्दल खात्रीशीर सांगता येत नाही. डाव्या बाजूच्या देवकोष्ठकात गणपतीची सुरेख कोरीवकाम केलेली मूर्ती आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून मागच्या दोन्ही हातामध्ये परशू आणि अंकुश ही दोन शस्त्रे धारण केलेली आहेत. पुढच्या डाव्या हातामध्ये बीजापूरक असून उजव्या हातात भग्नदंत पकडलेला दिसतो. गणपतीच्या पोटाला नागबंध असून डाव्या बाजूला मांडी घातलेली तर उजवा पाय उभा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आहे. गर्भगृहात प्रवेश केल्यावर शिवपिंडीच्या मागील बाजूस देवकोष्ठक आहे. मंदिराचे शिखर आयताकृती दगड भौमितिक पद्धतीने एकमेकांवर रचून ठेवून तयार केलेले दिसते. शिवपिंडीची शाळुंका गोलाकार असून लिंग हे रुद्राक्ष स्वरूपाचे आहे. एकंदरीत यासुद्धा मंदिराची निर्मिती १६-१७ व्या शतकात शिवकाळ किंवा तद्नंतर झाली असावी असे वाटते. या मंदिरातील विष्णूमूर्ती आणि गणपती मूर्ती शिलाहारकालीन १२ व्या शतकातील असाव्यात. यादवकालीन स्तंभ शैली (हेमाडपंथी) मंदिर स्थापत्य प्रकार या दोन मंदिरामध्ये दिसत नाही. बहुधा १२ व्या शतकातील त्या धाटणीची मंदिरे याजागी असावीत. पण, नंतरच्या काळात त्याजागी मंदिराचे पुनर्निर्माण किंवा त्याचा जीर्णोद्धार झाला असावा असे वाटते. खांबाशिवाय, भिंती व घुमटाकार छप्पर असलेल्या मंदिरांना ‘पोटल’ पद्धतीची मंदिरे म्हणतात.

पुढे मुगाव गावाजवळ कृष्णा आणि कमंडलू नदीच्या संगमावर श्री गणकेश्वराचे पुरातन देवस्थान होते. त्याला ‘गणिकातीर्थ’ म्हटले जात होते. ५ जून १९७६ रोजी धोम धरणाच्या फुगवट्यामुळे मंदिर पाण्याखाली बुडाले. सदर देवस्थानाची स्मृती म्हणून श्री गणकेश्वर देवाची पुनःस्थापना वाई गणपती घाटावरील काशीविश्वेवर मंदिरातील उजव्या बाजूच्या ओवर्‍यात श्रीमंत अन्नपूर्णाबाई रास्ते यांनी ट्रस्टतर्फे केली गेली आहे.

या वास्तू हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. हा वारसा आपल्याला पुढच्या पिढीला दाखवायचा असेल, तर सरकारने अशा मंदिरांचे स्थलांतर व त्यानंतर त्याचे जतन पुरातत्व विभागाच्या मार्फत केले पाहिजे.

संदर्भ :- स्कंदपुराण कृष्णामहात्म्य
श्री क्षेत्र वाई वर्णन : गो. वि. आपटे
मंदिर कसे पहावे : गो. बं. देगलुरकर
काश्यपशिल्प


Back to top button
Don`t copy text!