दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सध्या राज्यात डोळे येणे (कंजंक्टिवायटीस) या डोळ्यांच्या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. आत्तापर्यंत मोठ्या शहरांतून ही साथ फैलावत असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने या डोळे येण्याच्या आजारापासून सतर्क राहा, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी नागरिकांना केले आहे.
याबाबत नगर परिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, डोळे येणे या आजारात सुरूवातीला डोळ्यांतून घाण येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, पाणी येणे, डोळे सुजणे अशी प्राथमिक लक्षणे दिसत असतात. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, सरकारी रुग्णालयात संपर्क साधावा किंवा शासनाच्या आरोग्य विभागाला कळवावे, असे म्हटले आहे.
कंजंक्टिवायटीस आजार झाल्यास घ्यावयाची काळजी…
हा डोळ्यांचा आजार झाल्यास संपूर्ण विलगीकरणासह घरी राहून विश्रांती घ्यावी, ज्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल. टॉवेल किंवा रूमाल कुणालाही वापरायला देऊ नये. आपले कपडे वेगळे धुतले जातील, याची काळजी घ्यावी. लक्षणे दिसून आल्यास स्वत:च्या मनाने औषध घेऊ नये, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संसर्ग जाईपर्यंत दररोज उशीची खोळ बदलावी. संसर्ग झालेला डोळा बोटाने चोळू नये. आवश्यक असल्यास टिशूचा वापर करावा. डोळ्यात धूळ किंवा काही जाण्यापासून जपावे, अन्यथा त्रास वाढू शकतो.