
स्थैर्य, फलटण, दि. १ : शहरातील मलठण भागात चालत असलेल्या आयपीएल मॅचवर सट्टा व मटका घेतल्या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा नोंद केला आहे. घटनास्थळावरुन दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून तिघांना अटक केली आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दिनांक २९ एप्रिल रोजी साडे आठच्या सुमारास शहरातील खंडोबा मंदिर जवळील जयकुमार पवार यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी तेथे मोबाईलवर व रोख स्वरुपात पैसे घेवून आयपीएल क्रिकेट म्याचेसवर व कल्याण मटक्यावर जयकुमार शंकरराव पवार रा. मलठण, वैभव सुनील जानकर रा. शुक्रवार पेठ व शशांक प्रशांत लांडे रा. पुणे हे आयपीएल क्रिकेट म्याच व मटक्यासाठी फोनद्वारे अॉनलाईन व रोख स्वरुपात पैसे स्विकारत होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर अमर पिसाळ (पूर्ण नाव माहीत नाही) रा. मारवाड पेठ, दत्ता कुंभार (पूर्ण नाव माहीत नाही) रा. वीटभट्टी जवळ मलठण, सुमित चोरमले (पूर्ण नाव माहीत नाही) रा. धनगरवाडा, बुधवार, अमित कुरकुटे रा. उमाजी नाईक चौक, अमोल काळे रा. दत्तनगर, संतोष काळे रा. लक्ष्मीनगर, जेबले (पूर्ण नाव माहीत नाही) शंकर मार्केट, शौकत यासीन शेख रा. बिरदेव नगर, जाधववाडी ( फ ), नटराज क्षिरसागर रा. लक्ष्मी नगर, फलटण या नऊ जणांविरुध्द पैसे लावल्या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक एलईडी टीव्ही, ऍक्टिवा मोटर सायकल, चार मोबाईल, रोख रक्कम, कॅल्क्युलेटर, कागद, जुगारासाठी लागणारे साहित्य असा एक लाख ९८ हजार ८३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सचिन मेंगावडे यांनी दिली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन राऊळ हे करीत आहेत.