दैनिक स्थैर्य । दि.३१ डिसेंबर २०२१ । सातारा । अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडवणारे सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांना सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान सर्वोत्कृष्ट बॉक्सिंग प्रशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेने जगताप यांचा सन्मान केल्याने सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
सांगली येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या मुलांच्या व १७ व्या मुलींच्या ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य अशी एकूण ८ पदके मिळवून “टीम चॅम्पियनशिप” मिळवली. त्याबद्दल सातारा संघाचे प्रशिक्षक सागर जगन्नाथ जगताप यांना राज्य स्पर्धेचा “सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक” हा मानाचा पुरस्कार ऑलंम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, मुन्ना कुरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
जगताप यांच्या यशाबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, विभागीय सचिव योगेश मुंदडा, जिल्ह्यातील विविध बॉक्सिंग अकॅडमीचे पदाधिकारी मंगेश जाधव, हरीश शेट्टी, अमर मोकाशी, रवींद्र होले, संजय पवार, देवेंद्र बारटक्के,बापूसाहेब पोतेकर, सचिन दीक्षित, शैलेंद्र भोईटे, अजय कांबळे, रमेश शिंगटे, तेजस यादव, विनोद राठोड, अंकुश माने, गणेश माने, विठ्ठल गोळे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.