स्थैर्य, फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (दिनांक ४ जुलै) रोजी महाराष्ट्र राज्यात साजरा होणारा पारंपारिक बेंदूर सण साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांवर गो कोरोनाचा संदेश दिला. फलटण तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात बेंदूर सण पारंपारिक पद्धतीने बैलांची वाद्याच्या गजरात मिरवणूक काढून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी सकाळपासूनच शेतकरी आपल्या लहान, मोठ्या जनावरांना रंग-रंगोटी करुन नविन दोरखंड आणून पशुधनाची पूजा करतात. पुरणपोळीचा नैवद्य हि बेंदूर या सणादिवशी केला जातो. लहान मोठ्या पशुधनास लागणारे दोरखंड व घरामध्ये पूजेसाठी लागणारी कुंभारांनी बनवलेले मातीचे बैल खरेदीसाठी बाजापेठेत नागरिक गर्दी करतात. सणादिवशी जनावरांची मोठी मिरवणूक काढली जाते. तसेच हा सोहळा पाहण्यासाठी महिला-पुुुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने गर्दी होणारे सर्व धार्मिक सण, बाजारामध्ये सोशल डिस्टन्सचे उल्लंघन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पारंपरिक बेंदूर सणांवरही कोरोनाचे संकट आलेले आहे. बेंदराचे सर्व कार्यक्रम रद्द करुन घरगुती पध्दतीने बेंदूर साजरा करण्याचे आवाहन ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी शांततेत घरगुती पद्धतीने सण साजरा करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी रंगविलेल्या बैलांच्या अंगावर गो कोरोना गोचा संदेशही दिला.