लॉकडाऊनच्या विरोधात खा. उदयनराजे यांचे भिक मागो आंदोलन, जनतेतून उद्रेक होण्याचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ११: सातारा येथील पोवई नाक्यावर राज्य शासनाच्या कडक निर्बंधाचा निषेध करत खासदार उदयनराजे यांनी भिक मागो आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे. जनतेचा उद्रेक होण्याची वाट बघू नये, असा इशारा खा. उदयनराजे यांनी केला.

शासनाच्या लॉकडाउन विरोधात भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी सातारा येथील पोवाईनाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्यासमोरील झाडाखाली चक्क पोतं टाकून भीक मागो आंदोलन केले. यावेळी उदयनराजे यांनी सचीन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनामुळे सातार्‍यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. उदयनराजे यांनी या अगोदर देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. संपूर्ण महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मुंबई-पुण्यासारख्या शहरातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना छोटे व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातून जोरदार विरोध होत आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाउन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान, बुडणार्‍या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी दिला होता.


Back to top button
Don`t copy text!