
दैनिक स्थैर्य । 8 मार्च 2025। फलटण । येथील जिंती नाका येथे माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण व स्व.वेणुताई चव्हाण यांचा संयुक्त स्मारक आहे. हे स्मारक व त्याच्या सभोवतालच्या संरक्षक भिंतीची पडझड होऊन दुरावस्था झालेली आहे. तरी या स्मारकाचे संरक्षक भितींचे सुशोभिकरण करावे, अशी निवेदनाद्वारे मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या सुचनेनुसार शहराध्यक्ष पंकज पवार यांनी उपमुख्याधिकारी तेजस पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी उपाध्यक्ष शंकरराव लोखंडे, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष अल्ताफ पठाण उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की, याबाबत काँग्रेस वतीने प्रशासनास अनेकवेळा निवेदने दिलेली आहेत. परंतु प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. वास्तविक फलटण हे स्व.वेणुताई चव्हाण यांचे माहेर असून समस्त फलटण वासियांना याचा अभिमान आहे 12 मार्चला स्व. यशवंतराव चव्हाणांची जयंती असते. यावेळी याठिकाणी तालुक्यातील अनेक संस्था, नागरिक येथे अभिवादन येत असतात.
याठिकाणी स्मारक परिसराची झालेली पडझड तसेच तेथे असलेला कचरा व गुटखा व मद्याच्या रिकाम्या बाटल्या अशा प्रकारे झालेली दुरावस्था पाहून मन व्यथित होते. प्रशासनाने तातडीने स्मारकाची व संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करावे.
तसेच सध्याचे वाहतुकीचे वाढते प्रमाण पाहता बारामती पुल ते श्रीराम कारखानामार्गे मार्केट यार्डकडे जाणारा रस्त्याचा वापर होणे साठी वाहतूक वळवणे आवश्यक आहे.
नाना पाटील चौक येथे सिग्नल यंत्रणा बसवलेली आहे मात्र ती अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी नेहमीच वाहतूकीची कोंडी होते. त्यातच काही अवजड वाहने चुकीच्या बाजूने वळण घेत असतात यातच एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, यामुळे तातडीने सिग्नल यंत्रणा सुरू करावी.
शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर नवीन व्यापारी संकुल झालेली आहेत परंतु पार्किंग नसल्याने संबधित आपली वाहने रस्त्यावर उभी करतात यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून सुविधा मिळणेबाबत संबंधित विभागांना योग्य सुचना द्याव्यात.