पायाभूत सुविधा पुरवितानाच कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । मुंबई । मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच शहरातील कोळीवाडे पर्यटनदृष्ट्या आकर्षणाचे केंद्रबिंदू व्हावेत यासाठी त्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि त्यांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई सौंदर्यीकरणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, पर्यटनदृष्ट्या मुंबईचे महत्त्व वाढविण्यासाठी या महानगरीचा कायापालट होणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांचे, हेरिटेज इमारतींचे, वाहतूक बेटं, चौक यांचे सुशोभीकरण मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्याला गती द्यावी.

मुंबईतील कोळीवाड्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करून कोळीवाडे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होतील यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होण्यास तेथील संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची ओळखही देशविदेशातील पर्यटकांना होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबईतील पोलिस वसाहती, शासकीय रुग्णालये, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना निधी देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मुंबईतील वॉर्डमधील चौक, रस्ते, पदपथ, रस्ते यांवर सुशोभीकरण करतानाच गेट वे ऑफ इंडिया, हॅंगिंग गार्डन, शहीद भगतसिंह रोड, फोर्ट, रिगल सिनेमा सर्कल आदी ठिकाणी थ्री डी होर्डींग्ज, डिजिटल फलक लावण्याबाबत यावेळी चर्चा झाली.


Back to top button
Don`t copy text!