स्थैर्य, सातारा, दि.२६: घटस्फोटाचा दावा सुरू असतानाच पतीने मुलीच्या ताबा देण्यावरून पत्नीस सातारा येथून हातपाय बांधून गाडीतून पळवून नेले व तिला अक्कलकोटपर्यंतच्या प्रवासात मारहाण केली व मुलीचा ताबा न दिल्या जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे त्याने पहिले लग्न झाल्याचे लपवून संबंधित महिलेशी दुसरे लग्न केले आहे. याप्रकरणी संशयित तानाजी गणेश गोरे रा. टेंभूर्णी रोड, गोरे वस्ती, कुर्डू, ता. माढा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सौ. स्नेहल गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तानाजी गणेश गोरे याने त्याचा पहिला विवाह झाल्याची माहिती लपवून स्नेहल गोरे यांच्याशी फसवून विवाह केला होता. त्यांना कु. तेजस्वी नावाची एक मुलगी आहे. तानाजी आणि स्नेहल यांच्यात घटस्फोटाचा दावा सध्या सुरू आहे. असे असताना तानाजी गोरे आणि विठ्ठल माळी (पूर्ण नाव माहित नाही.) यांनी संगनमत करून सौ. स्नेहल गोरे यांना सातार्यात बॉम्बे रेस्टॉरंंटनजिक कारमध्ये जबरदस्तीने बसवले. त्यांचे हातपाय बांधून गाडी अक्कलकोटच्या दिशेने नेली. सातारा ते अक्कलकोटच्या प्रवासादररम्यान त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच सौ. स्नेहल यांची आई प्रमिला यांना फोन करून मुलगी कु. तेजस्वी हिचा ताबा दिला नाही तर स्नेहल यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी तानाजी गोरे आणि विठ्ठल माळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास रोकडे करत आहेत.