आता तरी शहाणे व्हा !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०८ : कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागल्याने अंशत: लॉकडाऊनच्या स्थितीत आपण पुन्हा एकदा गेलो आहोत. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून सतावणारा कोरोना काही केल्या आपली पाठ सोडायला तयार नाही. गेली 3 – 4 महिने संक्रमण काही अंशी मंदावलेले असताना अचानक ते पुन्हा वेगाने वाढू लागल्याने वाढती रुग्ण संख्या, आरोग्य यंत्रणेवर ताण, बेड्स, व्हेंटीलेटर, आदींची कमतरता, संचारबंदी, लॉकडाऊन, आर्थिक परवड, उपासमारी असे मागचेच दिवस पुन्हा आपल्या सर्वांच्या वाट्याला येऊ घातले आहेत.

वास्तविक पाहता कोरोनाच्या संक्रमणाचे सूत्र हे फारच व्यापक आहे. एकदा संक्रमण सुरु झाले की ते आटोक्यात आणणे फार मुश्कील. कारण; यावर आजमितीसही संपूर्ण जगात कोणाकडेच कुठलाही रामबाण उपाय उपलब्ध नाही. मग असे असताना नागरिकांनी मध्यंतरीच्या काळात म्हणजेच सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्यानंतर जे कोरोनाला अतिशय ‘हलक्यात’ घेतले तेच आत्ता ‘महागात’ पडत आहे. अनलॉकनंतरही मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टंसिंग राखणे या त्रिसूत्रीचा वापर जर सर्वांनी काटेकोरपणे केला असता तर आजची भिषण परिस्थिती पुन्हा आपल्यावर ओढावलीच नसती. अनलॉकनंतर बाजारपेठा, पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे, विवाहसोहळे, इतर सार्वजनिक कार्यक्रम लोकांच्या गर्दीने फुलून गेले होते. शिवाय या गर्दीत अनेकांचा तोंडावरचा मास्क गायब; सॅनिटायझरचा वापर बंद आणि सोशल डिस्टंसींगचा फज्जा अशी कोरोना संक्रमणाला निमंत्रण देणारी त्रिसूत्री सर्रास अवलंबली जात होती. याकडे माध्यमांनी लक्ष वेधूनही लोकांच्यात तर फरक पडलाच नाही मात्र दुर्दैवाने शासकीय यंत्रणाही याबाबतीत थोडी गाफीलच राहिली. शिवाय लसीकरण सुरु झाल्यावर अनेकांचा भ्रम असा झाला की, लस आली म्हणजे आता आपण कोरोनाच्या दुष्टचक्रातून सुटलो. पण ‘लस ही केवळ कोरोनाच्या भिषण आघातापासून आपला बचाव करणार आहे; लस घेतली तरी कोरोनाचा प्रार्दुभाव होवू शकतो’ हे कुणी डोक्यातच घेतले नाही. आणि या सगळ्या बेफीकीरीचा, ‘मला काही होत नाही’ या अभिर्वाभावाचा परिणाम आता भोगण्याची पाळी सर्वांवर आली आहे. लोकांच्या मनातील कोरोनाविषयीची भिती गेली हे जरी सकारात्मक असले तरी गांभीर्य, दक्षता टिकून राहिला हवी होती; हे देखील तितकेच खरे.

आता महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. फलटण तालुक्यातही रुग्णसंख्येचा मंदावलेला दर दिवसागणिक दुपटी – तिपटीने वाढत आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावांमधून रोज रुग्ण आढळू लागले आहेत. असे असताना अजूनही काही लोकांमधली बेफिकीरी काही कमी झाल्याचे दिसून येत नाही. विनामास्क फिरणार्‍यांवर होणार्‍या दंडात्मक कारवाईमधील आकड्यांवरुनच लोक किती गाफील आहेत हे स्पष्ट होत आहे. कोरोनाचा हाहाकार अनुभवास असताना किमान आता तरी लोकांनी शहाणपणाने कडक बंधने पाळणे आवश्यक आहे. निदान कोरोनाच्या दुष्टचक्रात सापडल्यावर खाजगी रुग्णालयात करावा लागणारा लाखो रुपयांचा खर्च, कुटूंबाची वाताहात, कोवीड नंतर उद्भवणारे आजारपण हे संभाव्य धोके लक्षात घेवूनतरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

शेवटचा मुद्दा –
राज्यसरकारच्या आदेशानुसार 5 एप्रिलपासून दुकाने बंद ठेवण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप कडक लॉकडाऊनची घोषणा जरी झाली नसली तरी कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी ‘लॉकडाऊन’ शिवाय दुसरा कुठलाच उपाय नाही. पण ‘लॉकडाऊन’ मुळे होणारे आर्थिक संकट सरकार असो वा सर्वसामान्य नागरिक; ते कुणालाच परवडणारे नाही. त्यामुळे एका बाजूला आड आणि दुसर्‍या बाजूला विहीर, म्हणजे दोन्ही बाजूलाही संकटे आहेत. ‘कोणत्याच बाजूस रस्ता नसून दुतर्फा मरण सारखेच’ अशी अडचणीची स्थिती सरकारपुढे निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी भान ठेवून वागणे स्वत:सह इतरांच्याही हिताचे आहे.

– रोहित वाकडे,
संपादक, सा.लोकजागर.


Back to top button
Don`t copy text!