स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कारखाना कार्यस्थळावर साजरी
स्थैर्य, भुईंज, दि. 01 : भारत हा जगातील मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. त्यातील तरूणाईची संख्या मोठी असून तेच आपलं बलस्थान आहे. परंतू आज ग्रामीण भागातील प्रत्येकामध्ये नकरात्मकतेची भावना विशेषतः भाषेची अडचण निर्माण होत आहे. सन 2032 मध्ये भारत हा महान देश होणार असून ग्रामीण तरूणांनी भाषेचा व इतर बाबतीमधील नकारात्मक न्युनंगड बाजूला ठेवून उद्योगांमधील नव्या आव्हांनाना सकारात्मकतेने सामोरे जावून स्वतःचे कुटुंब अन देश घडविण्याचे काम करावे, असे आवाहन रूरल फौंडशनचे प्रदीप लोखंडे यांनी केले.
किसन वीर सातारा साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रदीप लोंखडे यांचे ‘बदलता ग्रामीण भारत’ या विषयावर व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्यासह कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
प्रदीप लोखंडे पुढे म्हणाले, कोणताहा देश शिक्षणाने प्रगत होत असतो. आज ग्रामीण भागातील शिक्षण खर्या अर्थाने जवळ आले असुन त्याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होत असताना दिसत आहे. आज आपल्या देशाच्या लोकसंख्येचा मोठा बाऊ आपणच करीत आहोत, परंतु ती लोकसंख्या नसून ते आपले ग्राहक आहेत असा विचार करून उद्योग केल्यास त्यामध्ये निश्चितच यश मिळणार आहे. ब्रिटीशांनी स्वतःच्या सोईसाठी आपल्याला फक्त क्लार्क होण्याचे शिक्षण दिले. त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मानसिकतेवर झाला आहे. यावर मात करण्यासाठी नवनवीन शैक्षणिक आव्हांनाना सामोरे जावून आपले भविष्य उज्वल करण्याची गरज आहे. आज मुलींच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरारी निश्चितच नोंद घेण्यासारखी आहे. त्यांना आपण आत्मविश्वास दिला तर देशाच्या प्रगतीत त्या मोलाचा वाटा उचलू शकतात. ग्रामीण भागातील तरूणांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी मदनदादा भोसले यांनी केलेला हा प्रयोग निश्चितच आनंददायी आणि दिलासा देणारा ठरेल. नवनवीन आव्हानांना सामोरे जात असताना देश बदलतोय या कल्पनेचा अनुभव स्वतः घ्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना प्रदीप लोखंडे यांनी समर्पक उत्तरे दिली.
मदनदादा भोसले यांनी आपल्या मनोगतात एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात झपाटून काम केल्यास काय काम निर्माण होते, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रदीप लोखंडे. धोम (ता. वाई) सारख्या ग्रामीण भागातील या उद्योजकांने आज देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रामणिक प्रयत्न केला. कृषिदिनाचे औचित्य साधून त्यांचे मार्गदर्शन आजच्या पिढीला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
दरम्यान, हरित क्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कारखाना कार्यस्थळावर अभिवादन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, राहुल घाडगे, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, विजय चव्हाण, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव,माजी संचालक केशवराव पाडळे, अॅड. धनंजय चव्हाण, राज माजगावकर, शेखर भोसले-पाटील, हणमंत गायकवाड, जयवंत साबळे, अनिल वाघमळे, संदीप कोरडे, सागर जमदाडे, संतोष जमदाडे, विकास जमदाडे, सचिन जमदाडे, उमेश जमदाडे, स्वप्नील जमदाडे, सौ. सुजाता कोरडे, सौ. मेघा जमदाडे, शितल जमदाडे, कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.