स्थैर्य, सातारा, दि.२०: सध्या काँक्रिटीकरणाच्या जंगलामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवीवस्तीतील वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सातारा तालुक्याचा पश्चिम भाग हा वनसंपदेने नटलेला भाग. या ठिकाणी विविध वनप्राण्यांच्या प्रजाती पहायला मिळतात. परंतु, अलीकडे वन्यप्राण्यांचा वावर हा मानववस्तीमध्ये वाढू लागला असल्याने घरातील गुरांवर हल्ल्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे.
तालुक्यातील नित्रळ येथील रमेश वांगडे यांच्या कुत्र्यावर रविवारी हल्ला केला, तर त्याच रात्री काशीनाथ वांगडे यांना कुत्र्यांचा आवाज कानी पडताच खिडकीतून पाहिले असता, बिबट्याने तेथून पोबारा केला. तद्नंतर बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास ताकवली येथे भगवान रामचंद्र माने यांच्या गाईवर हल्ला करत जखमी केले. तर मौजे कुरुळबाजी (ता. सातारा) येथील ग्रामस्थांचा मालकी हक्क असलेल्या खाकट क्षेत्रात १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ दरम्यान जगन्नाथ भंडारे यांची एक शेळी, दीपक भंडारे यांचा एक बोकड आणि विजय कुरळे यांची मेंढी अशा लागोपाठ तीन पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात दीपक भंडारेंचा एक बोकड आणि विजय कुरळे यांची मेंढी जागीच मृत्यू पावली असून एक शेळी गंभीर जखमी आहे. तसेच विजय कुरळे यांचा आणखी एक मेंढा बेपत्ता असल्याचे गावचे पोलिस पाटील अनिकेत कांबळे यांनी सांगितले.
परळी भागातील परिसर हा घाटमाथ्याचा अन् झाडी झुडपांचा यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांची दहशत ही कायम असते. वारंवार होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले, त्यातच कित्येक शेतकऱ्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांना जिवास मुकावे लागले आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने भागातील बिबट्याची दहशत ग्रामस्थांमध्ये पहायला मिळत आहे. मात्र, वनविभाग याकडे गांभीर्याने बघत नसल्याने माणसांवर हल्ला करण्याची वाट पहात आहेत का?, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. वनविभागाने तत्काळ योग्य अशी पावले उचलण्याची येथील ग्रामस्थ मागणी करत आहेत.