स्थैर्य, दहिवडी, दि.२०: माणमधील बिदाल व हिंगणीत अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर “प्रभावित क्षेत्र’ व परिसरातील दहा किलोमीटर त्रिजेचा परिसर “सतर्क क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.
पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना गुरुवारी (ता. 14) मलवडीत एक कावळा मृतावस्थेत सापडला. हा मृत कावळा तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्यानंतर रविवारी (ता. 17) हिंगणीत 46 व बिदाल येथे 26 कोंबड्या अचानक दगावल्याच्या घटना घडल्या. पशुधन विकास अधिकारी डॉ. अरिफ इनामदार व डॉ. बबन मदने यांनी पाहणी केली. त्यानंतर मृत कोंबड्यांचे नमुने जमा करून ते तपासणीसाठी पाठवले आहे. पुण्याहून ते भोपाळला पाठवले गेले आहेत. काल (ता. 18) पुन्हा हिंगणी येथे रामोशीवाडा या वस्तीवरील पाच शेतकऱ्यांच्या 25 कोंबड्या दगावल्या.
या घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले असून, कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बिदाल व हिंगणी येथील दहा किलोमीटर त्रिजेचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी व तहसीलदार बाई माने परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
संबंधित ठिकाणच्या परिसराची पूर्ण पाहणी केली असून, पक्ष्यांच्या गणना व तपासणी केली आहे. पक्षीपालक व शेतकऱ्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात पक्षी मृत आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.