जिल्ह्यातील ‘टॉप टेन’ गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई करणार : शंभूराज देसाई


स्थैर्य, सातारा, दि.२० : जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या टॉपच्या गुन्हेगारांची जिल्हा पोलिसांनी यादी तयार केली असून, त्यांच्यावर लवकरच मोकांतर्गत कडक कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असून, गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

पोलिस दलाच्या शिवतेज हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलिसांच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते. शंभूराज म्हणाले, “जिल्हा पोलिसांची कामगिरी 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये चांगली झाली आहे. दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्या तुलनेत गर्दी मारामारी, दुखापत व शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रमाण वाढले आहे.

गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी हे प्रमाण 35.05 टक्के होते, ते 2020 मध्ये 58.41 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस दलाने प्रभावीपणे तडीपारी व मोकाच्या कारवायाही केल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी टॉप टेन गुन्हेगारांची पोलिस ठाणेनिहाय यादी करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोकासारख्या कठोर कारवाया करण्यात येतील.”

पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना ते म्हणाले, “नियोजन समितीतून पोलिस दलाला अडीच कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यातील 50 लाख निधी हा विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी ठेवण्यात आला आहे, तसेच पोलिस दलाला दहा नवीन वाहनेही यातून खरेदी केली जाणार आहेत. येणाऱ्या अर्थसंकल्पात प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक नवीन गाडी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर तापोळा परिसरातील 52 गावे महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याला जोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.”


Back to top button
Don`t copy text!