
स्थैर्य, बार्शी, दि. 28 : पावसाळ्याच्या अनुषंगाने बार्शी शहरात, बार्शी नगर परिषदेमार्फत पावसाळ्यापूर्वीची घ्यावयाची स्वच्छतेची कामे, रोगराई पसरू नये म्हणून घ्यावयाची काळजी व उपाययोजना करणे या संदर्भात आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी आज बार्शी नगर परिषद येथील कर्मवीर जगदाळे मामा सभागृहात आढावा बैठक घेतली.
या बैठकीत बार्शी शहरातील सर्व गटारी, ओढे-नाले यांमधील गाळ काढून त्याचा निचरा करणे, स्वच्छता करण्यासाठी लागणारी वाहने, जे.सी.बी.मशीन, पोकलेन मशीन, नवीन स्वच्छता कंत्राटी कामगार वाढविणे, औषध फवारणी आदी विषयांवर चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या पंधरा दिवसांत तातडीने स्वच्छतेची कामे सुरू करून, बार्शी शहर स्वच्छ करण्याच्या सूचना आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या.
सध्या बार्शी शहरात अनियमित होत असलेल्या पाणीपुरवठ्या बद्दल बोलताना ते म्हणाले की, कंदर येथील मोटर नादुरुस्त झाल्यामुळे बार्शी शहराला सध्या विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. ती मोटर कोल्हापूर येथे दुरुस्तीला पाठविण्यात आलेली असून ती येण्यास अजून आठ दिवसांचा अवधी आहे. तरी नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
त्याचप्रमाणे या बैठकीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बार्शी नगर परिषदेमार्फत शहरात करण्यात येत असलेली आरोग्य सुविधा, उपाययोजना आदी गोष्टींची माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपली व आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी आवर्जून केले. या बैठकीस नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, आरोग्याधिकारी विजय गोदापुरे, स्वच्छता पर्यवेक्षक मनोज खरात, पाणी पुरवठा सभापती संतोष भैय्या बारंगुळे, नगरसेवक अमोल चव्हाण, बाळासाहेब गुंड, सतीश कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.