दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२३ | बारामती |
चक्क… ज्योतिषाकडून मुहूर्त काढून १ कोटी ७ लाख रुपयांचा दरोडा टाकल्याने बारामती हादरली आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी महिलेच्या हात-पाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज चोरला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
देवकाते नगर (ता. बारामती) येथील एका घरात घुसून महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांचा दरोडा चोरट्यांनी टाकला. सागर शिवाजी गोफणे हे पत्नी तृप्ती व दोन मुलांसह देवकाते नगर येथे राहतात. सागर हे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी तृप्ती व मुले घरी होती. चोरट्यांनी रात्री ८ वाजताच्या सुमारास गोफणे यांच्या घराच्या कंपाउंडवरून घरात प्रवेश करत तृप्ती यांना मारहाण केली. तसेच त्यांचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून ९५ लाख ३० हजाराची रोख रक्कम, ११ लाख ५९ हजार रुपयांचे २० तोळे दागिने, ३५ हजार रुपयांचा मोबाईल असा १ कोटी ७ लाख रुपयांचा ऐवज चोरला.
या दरोड्यानंतर बारामती पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने हलवून गोपनीय खबर्याकडून माहिती मिळवून या चोरीतील सचिन जगधणे (वय ३०, रा. गुणवडी, २९ फाटा, ता. बारामती), रायबा चव्हाण (वय- ३२, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), रविंद्र भोसले (वय- २७, रा. निरावागज, बारामती), दुर्योधन जाधव (वय- ३५, रा. जिंती, ता. फलटण, जि. सातारा), नितीन मोरे (वय- ३६, रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण (वय- ४३, मूळ रा. आंदरुड, ता. फलटण, जि. सातारा) अशी या दरोड्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.