दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील अनेक भागात सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कचा खेळखंडोबा सुरू आहे. या कंपन्यांना ग्राहकांनी मनमानी रिचार्ज प्लॅनचे पैसे देवूनही समाधानकारक नेटवर्क मिळत नाही. वीज गेली की मोबाईल नेटवर्क जाणे, हे तर नित्याचेच झाले आहे. यामुळे बँका, इतर संस्था, दुकानदार तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे, सामान्य ग्राहक जाम वैतागले आहेत.
फलटण तालुक्यातील अनेक ठिकाणी सर्वच टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये तफावत जाणवत आहे. शहरासह ग्रामीण भागात असलेल्या अनेक लोकांना आपण दिलेल्या पैशाच्या बदल्यात योग्य तितके नेटवर्क भेटत नसल्याच्या तक्रारी अनेकजण करत आहेत. यामध्ये जियो, एअरटेल, वी, बीएसएनएल अशा चारही कंपन्यांपैकी कोणीही सुरळीत आणि हमीची सेवा देत नसल्याच्या ग्राहकांचा तक्रारी आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी आपल्या नेटवर्कमध्ये त्वरित सुधारणा करावी, अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे.