दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । बारामती । बारामती शहरातील माळावरची देवी मंदिर येथे नवरात्र निमीत्त नऊ दिवस जत्रेचे आयोजन केले जाते. दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात त्याच प्रमाणे खेळणी, खाद्य पदार्थ विक्रेते, मनोरंजन,पाळणे, झोके आदी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे दररोज मोठी गर्दी या ठिकाणी होत असते त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी किंवा सुलभ शौचालय आदी कोणतीच सुविधा बारामती नगरपरिषद देत नाही.
संत तुकाराम महाराज किंवा सोपान काका किंवा इतर संतांच्या पालख्या आल्यावर जसे तात्पुरते शौचालय, मुतारी किंवा पिण्याचे पाणी पिण्यासाठी टँकर आदी सुविधा पुरवते तसे नऊ दिवस काहीच पुरवत नसल्याने येणारे काही भाविक व विक्रेते हे आजूबाजूच्या परिसरात घाण करतात, नीरा डावा कालव्यातील पाण्याने मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर स्त्री पुरुष आंघोळ करतात व शौचालय साठी परिसराचा वापर करतात त्यामुळे परिसरात दुर्घन्धी पसरते व साथीच्या आजाराची शक्यता निर्माण होते परिसरातील देसाई इस्टेट, अंबिका नगर, गौतम दोषी बाग, जळोची गाव रस्ता,नीरा डावा कालवा भराव आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण साचते व दुर्गंधी पसरते त्यामुळे नगरपरिषद ने तात्काळ पिण्याचे पाणी टँकर पुरवावेत व तात्पुरते शौचालय उभे करावेत अशी मागणी भाविकांनी व स्थानिक नागरिका मधून होत आहे.
वीर सावरकर क्लब च्या समोर जवळपास एक ते दीड एकर मोकळी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी पिण्याचे पाणी टँकर व शौचालय उभे करण्यासाठी तात्पुरती जागा आहे त्याचा वापर झाल्यास इतर ठिकाणी घाण होणार नाही त्यामुळे उर्वरित दिवसा मध्ये तरी नगरपरिषदने त्वरित भाविक व विक्रेते यांची सोय करावी अशी मागणी नागरिक व भाविक करीत आहेत.
स्वीमर्स टॅंक ची सामाजिक बांधिलकी
देवीच्या मंदिर परिसरातील भाविक व विक्रेते यांची गैरसोय होत असल्याने वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या वतीने नऊ दिवस 24 तास मोफत पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.