स्थैर्य, फलटण दि.2 : येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे निवृत्त शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश तथा बापूराव देशपांडे (वय 72) यांचे आज दि.2 रोजी अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.
बापुराव देशपांडे यांनी 33 वर्षे शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचे काम केले होते. या काळात दापोली तालुक्यातील हर्णे व दाभोळ तसेच सातारा जिल्ह्यातील खटाव व फलटण येथे त्यांनी सेवा बजावली. फलटण तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी त्यांनी भरीव योगदान दिले.
सन 1990 पासून पत्रकारिता सुरु केल्यानंतर ते आजही या क्षेत्रात कार्यरत होते. तालुक्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष, धोम – बलकवडी व निरा – देवघर पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण, फलटण तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे होणारे बदल, फलटण – लोणंद – बारामती रस्त्याचे चौपदरीकरण, फलटण – बारामती रेल्वेमार्ग आदी विषयांवर त्यांनी केलेले वार्तांकन विशेष गाजले होते. वार्तांकनाबरोबरच छायाचित्रणाचीही त्यांना विशेष आवड होती. पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या ‘विशेष दर्पण’ पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तालुका स्तरीय मूल्यांकन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, महात्मा एज्युकेशन सोसायटी आदी संस्थांच्या माध्यमातून ते साहित्य, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.