स्थैर्य, नवी दिल्ली, दि.३: पीएमसी बँक, लक्ष्मीविलास बँक आणि येस बँकेसह अनेक बँकांच्या खातेधारकांना गेल्या काही वर्षांत आपला पैसा काढण्यात त्रास सोसावा लागला. मात्र, आता तसे होणार नाही. सरकार जमा विमा आणि कर्ज हमी महामंडळ अधिनियम-१९६१मध्ये(डीआयसीजीसी) दुरुस्ती करत आहे. याअंतर्गत एखाद्या बँकेवर मोरॅटोरियम लागत असले तरीही जमाकर्त्यांना जमा विमा आणि कर्ज हमी महामंडळाकडून जमा पैसे परत मिळू शकतील. ही हमी पाच लाख रुपयांपर्यंत असेल.
गेल्या वर्षी अर्थसंकल्पात सरकारने बँक ठेवीवर विमा सुरक्षेला १ लाख रुपयांवरून वाढवून ५ लाख रु. केले होते. मात्र, असे असताना लक्ष्मीविलास बँक प्रकरणात ग्राहकांना याचा फायदा मिळू शकला नाही आणि बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून लावलेल्या मोरॅटोरियमदरम्यान खातेधारक आपले पैसे काढू शकले नाहीत. बँक पूर्णपणे बंद झाली असेल किंवा दिवाळखोरीत निघाली असेल तरच या विम्यातून पैसा मिळतात, हे याचे कारण होते. महाराष्ट्रातील पीएमसी बँकेत खातेधारकांना दीर्घकाळापासून आपले पैसे मिळण्याची प्रतीक्षा आहे. कारण, बँक विकली गेली नाही, ना लिक्विडेट झाली आहे.
सोने : १ एप्रिलपासून १ लाखाचे सोने खरेदी केल्यावर वाचतील २१९३रु.
अर्थसंकल्पात सोन्यावर सीमा शुल्क कमी केल्याने व कृषी उपकर,समाजकल्याण अधिभार लावल्याने सोन्यावर एकूण शुल्क १०.७५ टक्के होईल. हा दर १२.८८ टक्क्यांपेक्षा(१२.५०% कस्टम व ०.३८% सामाजिक सुधारणा अधिभार) २.१३% कमी आहे. मात्र, सीमा शुल्क कपातीमुळे जीएसटीतही घट येईल व सोन्यावरील करात एकूण घट २.१९ % येईल. म्हणजे, एक लाख सोने खरेदी केल्यास २१९० रु. वाचतील.
जमाकर्त्यांना दिलासा मिळेल
जमा रकमेचा विमा असतानाही जमाकर्त्यास याचा लाभ हा बँकेचा परवाना रद्द झाल्यास किंवा ती लिक्विडेट करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावरच मिळतो. बँकेवर मोरॅटोरियम लागले असेल तर जमाकर्त्याचे पैसे अडकतात. जमाकर्त्याचा हा त्रास वाचवण्यासाठी नियम बदलले जातील. – आदिल शेट्टी, बँकबाजार