दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना फलटण येथील त्यांच्या गुरुकुलमध्ये पाठविण्यात आले असल्याचे समजत आहे. ”ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या सूचनेनंतर आम्ही सदरील आंदोलन स्थगित करीत आहोत,” असे आंदोलन करणाऱ्या वारकऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे.
यंदा सुद्धा राज्य शासनाने पायी वारी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलेले होते. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असं काल ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडविण्यासाठी ह. भ. प. बंडातात्या कराडकर तिथं पोहचले. मग मात्र पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं होतं. ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर वारकऱ्यांनी घटनास्थळी भजन आंदोलन सुरू केलेलं होते.