सुधारणावादी पत्रकारितेचा पाया बाळशास्त्रींनी रचला: सुभाषराव शिंदे; फलटण येथे जयंतीनिमित्त ”दर्पण”कारांना अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २० : 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु करुन तत्कालिन समाजव्यवस्था व अन्यायकारक ब्रिटीश राजवट या विरोधात लोकजागृतीचे काम बाळशास्त्री जांभेकरांनी केले. आजची पत्रकारिता देखील समाजाला, शासनाला व लोकप्रतिनिधींना दिशा देण्याचे काम करत आहे. एखाद्या विकास कामामध्ये जितका लोकप्रतिनिधींचा सहभाग असतो तितकाच तिथल्या पत्रकारांचा देखील असतो. या विकासात्मक व सुधारणावादी पत्रकारितेचा पाया बाळशास्त्रींनी रचला; तोच वारसा पत्रकारांनी इथून पुढेही जपावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केली.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीनिमित्त येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन सुभाषराव शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, संस्थेचे पदाधिकारी व्यंकटेश देशपांडे, शांताराम आवटे, रविंद्र बर्गे, मसाप फलटण शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.रविंद्र कोकरे, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुभाषराव शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ यांच्या सुरु असलेल्या जांभेकरांच्या स्मरणकार्याचा मी पहिल्यापासूनचा साक्षीदार आहे. या कार्यामुळेच खर्या अर्थाने बाळशास्त्रींची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. यंदाच्या वर्षीपासून बाळशास्त्रींना जयंतीदिनी शासकीय स्तरावरुनही अभिवादन होत आहे; ही बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या या मागणीची पूर्तता करुन बाळशास्त्रींच्या कार्याचा योग्य सन्मान केल्याबद्दल राज्यशासनाला सुभाषराव शिंदे यांनी विशेष धन्यवाद दिले.

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, गेली 32 वर्षे बाळशास्त्रींचे स्मरण कार्य सुरु असून बाळशास्त्रींच्या जन्मगावी आम्ही त्यांचे यथोचित स्मारक उभे करुन त्यांची स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्याला फलटणसह संपूर्ण राज्यातील पत्रकारांची साथ लाभली आहे. बाळशास्त्रींची कर्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये शासनाच्या माध्यमातून भव्य स्मारक उभे रहावे तसेच मुंबई विद्यापीठाचे विभाजन होऊन कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना व्हावी आणि बाळशास्त्रींच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून या विद्यापीठाला बाळशास्त्रींचे नाव द्यावे; यासाठी शासनाकडे आमचा पाठपुरावा सुरु आहे. या दोन्ही मागण्यांसाठी राज्यातील पत्रकारांनी एकत्रित पुढाकार घ्यावा. आजच्या जयंतीदिनी शासकीय स्तरावरुनही अधिकृतरित्या बाळशास्त्रींना अभिवादन होत आहे ही निश्चितच आनंदाची बाब असल्याचे सांगून याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना बेडकिहाळ यांनी विशेष धन्यवाद दिले.

अरविंद मेहता म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ च्या माध्यमातून लोकाभिमुख पत्रकारिता केली. तत्कालिन ब्रिटीश सरकार विरोधात लोकांना जागे करण्याचे काम बाळशास्त्रींनी केले. पत्रकारिता, शिक्षण, खगोलशास्त्र, पुरातत्व संशोधन अशा एक ना अनेक क्षेत्रात जांभेकरांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा शासकीय स्तरावर जयंतीदिनी बाळशास्त्रींना अभिवादन होत आहे; बाळशास्त्रींच्या कार्याचे महत्त्व राज्यशासनाला इतक्या उशिरा समजले ही फार मोठी शोकांतिका आहे तथापी, याबाबत रविंद्र बेडकिहाळ यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले याचा अभिमान असल्याचेही मेहता यांनी आवर्जून सांगितले.

प्रा.रविंद्र कोकरे म्हणाले, बाळशास्त्रींनी ‘दर्पण’च्या माध्यमातून समाजाला दिशा दिली तर ‘दिग्दर्शन’च्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आजची पत्रकारिता खडतर असून पत्रकारांना ज्या प्रमाणे कौतुकाला सामोरे जावे लागते त्याचप्रमाणे अनेकदा धमकी, मारहाण अशा अनुचित प्रकारांनाही तोंड द्यावे लागत आहे. मात्र पत्रकारांनी न डगमगता पत्रकारितेला व्यवसाय म्हणून न मानता ती एक वसा म्हणून जोपासली आहे हेच बाळशास्त्रींच्या कार्याला साजेसे आहे.

प्रारंभी सुभाषराव शिंदे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी राजभाषादिनानिमित्त श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘नवराष्ट्र’ समुहाचा ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अरविंद मेहता यांचा तर डिजीटल मिडीयामध्ये नव्याने न्यूज अ‍ॅप सुरु केल्याबद्दल प्रसन्न रुद्रभटे यांचा सुभाषराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अमर शेंडे यांनी केले. कार्यक्रमास फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे उपाध्यक्ष बापूराव जगताप, ज्येष्ठ पत्रकार स.रा.मोहिते, रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!