बाळशास्त्री जांभेकरांची 175 वी पुण्यतिथी पोंभुर्ले येथे साध्या पद्धतीने साजरी होणार : रविंद्र बेडकिहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.१४: महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व पोंभुर्ले ग्रामपंचायत, जांभे देऊळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 175 व्या पुण्यतिथीचा 17 मे रोजी पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात दरवर्षीप्रमाणे होणारा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात लागू असणार्‍या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीने संपन्न होणार आहे. जांभे – देऊळवाडी येथील ज्येष्ठ नेते शांताराम गुरव, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सादिक डोंगरकर व देवगड तालुका शिवसेना प्रमुख अ‍ॅड.प्रसाद करंदीकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन एवढाच कार्यक्रम होईल, असे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, बाळशास्त्री जांभेकरांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्ताने हे वर्ष महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे ‘पत्रकार प्रबोधन’ वर्ष म्हणून विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. त्याचा एक भाग म्हणून 17 मे 2021 रोजी राज्यातील सर्व मराठी वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांची कार्यालये,शिक्षणसंस्था व वाचनालये, सार्वजनिक संस्था यांमधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्रास आदरांजली वाहून या ‘पत्रकार प्रबोधन’ वर्षाचा शुभारंभ कोवीड 19 चे सर्व शासन निर्देश पाळून करावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी नमूद केले की, बाळशास्त्री जांभेकर यांची ओळख पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ व पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ चे संपादक म्हणून आहेच. तथापि, पारतंत्र्याच्या ब्रिटीश राजवटीमध्ये शिक्षण, लोकशिक्षण, पुरातत्त्व संशोधन, मुंबईतील विविध लोकाभिमुख संस्थांचे संस्थापक, धार्मिक व सामाजिक सुधारणांचे आग्रही कृतीशील प्रबोधन, शालेय मराठी पाठ्यपुस्तकांचे लेखन, पहिले मराठी ग्रंथ समीक्षक, एलफिन्स्टन महाविद्यालयातील पहिले मराठी प्रोफेसर, अक्कलकोटच्या युवराजांचे प्रशिक्षक, पाठभेदयुक्त ज्ञानेश्‍वरीचे शिळाप्रेसवरील पहिले प्रकाशक, रॉयल एशियाटिक सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पुरातत्त्व संशोधनावर 90 शोधनिबंध लिहिणारे पहिले भारतीय लेखक, अशा विविध भूमिकेतूनही त्यांचे कार्यकर्तृत्त्व ऐतिहासिक असे आहे.

त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून या शतकोत्तर अमृत महोत्सवी पुण्यतिथी निमित्त आयोजित ‘पत्रकार प्रबोधन वर्षात’ पत्रकारांचे आरोग्य प्रशिक्षण, ग्रामीण पत्रकारांचे प्रश्‍न, महाराष्ट्राच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त 1960 नंतरची पत्रकारिता आणि महाराष्ट्र, ज्येष्ठ वयोवृद्ध पत्रकारांचे अत्यावश्यक प्रश्‍न, महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाची परंपरा, माध्यमांसमोरील आव्हाने अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद, मुलाखती, कार्यशाळा आदी कार्यक्रम कोवीड 19 च्या परिस्थितीनुसार ‘ऑनलाईन’ अथवा समारंभपूर्वक आयोजित केले जातील. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सर्व प्रकारच्या माध्यमांमधील पत्रकारांनी सहकार्य करावे व आपल्या काही सूचना असतील तर त्या [email protected] या ई-मेल वर अथवा संस्थेचे विश्‍वस्त अमर शेंडे यांच्या 9922778386 या क्रमांकावर जरुर कळवाव्यात, असे आवाहनही संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!