बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही; पण किती ठिकाणी द्यायचे हे सरकारने ठरवावे : देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागपूर, दि. २६: नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे केले आहे. या नामकरणाला नागपुरातील अनेक आदिवासी संघटनांनी विरोध केला. यासंदर्भात भाजपनेदेखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमचा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही, मात्र नामकरण करताना लोकांना विश्वासात घ्यावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यात आमचे सरकार होते तेव्हा आम्ही गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा विकास व्हावा म्हणून निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर सगळ्या आदिवासी संघटनांनी माझी भेट घेतली होती. त्या वेळी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला गोंडवाना असे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या वेळी त्यांना मी सांगितले होते की काम पूर्ण होईपर्यंत नाव देता येत नाही, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर गोंडवाना असे नामकरण करू. मात्र सरकार बदलले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले. त्याला आदिवासी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध नाही, पण कुठलेही नाव देताना सल्लामसलत न करता देणे आणि मग त्याला विरोध होणे योग्य नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊनच नाव दिले पाहिजे, असेही या वेळी फडणवीस यांनी म्हटले.


Back to top button
Don`t copy text!