रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यास हैदराबाद येथून अटक; साडेतीन महिन्यांपासून होता फरार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,हैदराबाद,दि १३:  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज.बोठे याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथे अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना फरार होता.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकऱ्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले.त्यांच्याविरोधातील दोषारोपपत्र ही न्यायालयात दाखल झाले आहे. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे मात्र फरार होता. पोलीस पथके त्याचा चौफेर शोध घेत होते. बाळ कोठे सापडत नसल्यामुळे पोलिसांविषयी देखील संशयाचे वातावरण तयार झाले होते. त्याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू झाली होती. शनिवारी अखेर त्याला हैदराबाद येथून अटक झाली. सुपारी देऊन बोठे याने जरे यांची हत्या का केली? या प्रश्नाचा उलगडा आता होणार आहे.

न्यायालयाने बोठे याला फरार घोषित करत 9 एप्रिल पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. तोपर्यंत तो हजर झाला नाही तर त्याच्या संपत्तीवर टाच लावण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. पोलिसांनी बोठे याच्या मालमत्ते विषयीचा तपशील गोळा केलेला होता. परंतु आता बोठे यास अटक झाल्यामुळे रेखा जरे हत्याकांडातील अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!