दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील हिमालयासारखं उत्तुंग आणि महाकाय महासागरासारखं अथांग व्यक्तिमत्व होतं. थोर समाजसुधारक, अस्पृश्यांचे उद्धारक, आदर्श लोकनायक, बहुजनांचे मुक्तिदाते, लोकशाहीचे प्रणेते, विषमतेचे विनाशक, मानवी हक्कांचे संरक्षक, दीन-दुबळ्यांचे वाली, मानवी स्वातंत्र्याचे कैवारी, थोर इतिहासकार, भारतीय घटनेचे शिल्पकार अशा अनेक विशेषणांनी साऱ्या जगात ओळखले जाणारे एकमेव महापुरुष म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. बाबासाहेब हे जागतिक कीर्तीचे थोर विद्वान होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर ज्ञानसाधना करून अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, कायदेशास्त्र, पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, भाषाशास्त्र, नीतीशास्त्र, घटनाशास्त्र, विज्ञान, तत्वज्ञान, अशा अनेक विद्याशाखांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे प्रावीण्य प्राप्त केले होते. त्यांनी देश-विदेशातील मोठ-मोठ्या विश्वविद्यालयांतून अनेक पदव्या मिळविल्या होत्या. आपल्या या अफाट ज्ञानाच्या बळावर ते कोणत्याही उच्च अधिकारपदावर विराजमान होऊन सुखासीन व ऐश्वर्यसंपन्न आयुष्य सहजपणे जगू शकले असते. परंतु त्यांनी प्रचंड मोठा त्याग करून आपले सारे आयुष्य जातीअंताच्या व मानवमुक्तीच्या महान लढ्यासाठीच वेचले. ‘मी जर माझ्या समाजबांधवांचा उद्धार करू शकलो नाही, तर मी स्वतःला गोळी मारून ठार करीन’ अशी शपथ बाबासाहेबांनी घेतली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे अत्यंत संघर्षमय होते. त्यांचे अखंड वाचन, प्रचंड लेखन आणि अविरत चिंतन यात कधीच खंड नसायचा. यासोबतच देश-विदेशातील दौरे, कार्यकर्त्यांशी संपर्क, मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या, राजकारणातील उघड व गुप्त शत्रूंशी मुकाबला, कौटुंबिक अडीअडचणी, आर्थिक विवंचना, सुशिक्षित सहकाऱ्यांचा अभाव, आरोग्याच्या कटकटी अशा अनंत अडचणींशी मुकाबला करत त्यांना समाजाचे नेतृत्व करावे लागत होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड शारीरिक व मानसिक तान येत असे. परंतु या सर्व अडचणी असतानादेखील जराही निराश न होता त्यांनी जीवनाकडे अत्यंत रसिकतेने पहिले. निरसपने जीवन जगणे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच त्यांनी सामाजिक कार्याचा प्रचंड मोठा व्याप असूनदेखील आपली रसिकता नष्ट होऊ दिली नाही. त्यांनी जीवनभर कला, साहित्य, निसर्ग, अभिनय, विनोद आणि संगीत यांचा मनमुरादपणे आस्वाद घेतला. बाबासाहेबांना संगीत कलेचा फार शौक होता. ते तबला वाजविण्यात पारंगत होते. लहानपणी कीर्तन व भजनाच्या वेळी ते तबला वाजवायचे. जेव्हा ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले होते, तेव्हा ते वेळात वेळ काढून बाळ साठे यांच्याकडून व्हायोलीन वाजवायला शिकत होते. त्यांच्या या संगीत शौकाबाबत बाबासाहेबांच्या राजगृहाचे ग्रंथपाल शां. शं. रेगे त्यांच्या भीमपर्व या ग्रंथात लिहितात की, “संगीताचाही त्यांना शौक होता. पण गाण्याच्या बैठकीत तासन तास अवघडत बसणे त्यांना जमण्यासारखे नव्हते. भजने, नाट्यसंगीत किंवा हलके फुलके गाणे त्यांना आवडत असे. काही जुन्या नाटकांतील पदे व काही लावण्या त्यांना मुखोदगत होत्या. खुशीत असतील तेव्हा आणि पुष्कळदा स्नानगृहात ते ही गीते सुरेल स्वराने म्हणत असत. एकदा दादरला कोहिनूर सिनेमात मराठी बोलपट पाहून आल्यावर ‘तू असतीस तर…..झाले नसते’ हे त्यातले द्वंदगीत ते कित्येक दिवस सुरेल चालीत गुणगुणताना अनेकांनी ऐकले आहे. मुंबईस मुक्काम असताना ते मास्टर कृष्णरावांना मुद्दाम पुण्याहून बोलवीत आणि त्यांची नाट्यगीते त्यांच्याकडून गाऊन घेत, रंगून जात. मास्तरांकडून त्यांनी ‘बुद्धवंदना’ रेकॉर्डसाठी बसवून घेतली होती. एच.एम.व्ही. च्या स्टुडिओत आंबेडकरांना मास्टर कृष्णराव आपली चाल म्हणून दाखवीत आणि बाबासाहेब त्यांना स्वरयोजनेच्या सूचना कशा करीत हे पाहणे मोठे गमतीचे असे. मास्टर बाबासाहेबांना फार मानीत आणि त्यांच्या हाकेनुसार केव्हाही येऊन ते त्यांना गाऊन दाखवत. बहुधा हे गाणे कसल्याच वाद्याच्या साथीशिवाय चाले आणि ताल असे तो मास्तरांच्या आणि बाबासाहेबांच्या टाळ्यांचा.”
बाबासाहेबांच्या संगीतप्रेमाविषयी एक आठवण सांगताना बाबासाहेबांचे निष्ठावंत सहकारी बळवंतराव वराळे लिहितात की, ‘१९३४-३५ सालची गोष्ट. बाबासाहेबांना वाटले, आपण सारंगी छेडण्याची कला हस्तगत करावी. दादरला वैद्य नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते या कलेत निपुण होते. त्यांना बोलावण्यात आले आणि या कलेतील उस्ताद म्हणून त्यांची नेमणूक केली. त्याच दिवशी सारंगी विकत घ्यायला बाबासाहेबांनी त्यांच्याजवळ पैसे दिले. वैद्य रोज सकाळी ‘राजगृह’ ला यायचे. ऑफिसला जायच्यापूर्वी आठ-नऊ वाजेपर्यंत बाबासाहेब सारंगी छेडण्याचे धडे तल्लीनतेने घ्यायचे. लवकरच सारंगी छेडण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. नंतर नंतर सारंगी छेडण्यात ते इतके तल्लीन होत असत की, अशा वेळी कुणी त्यांच्यापुढे येऊन उभे राहिल्याचेही त्यांच्या लक्षात येत नसे कित्येक वेळा ते सारंगी छेडीत असताना मी त्यांच्यासमोर उभा राहत असे. पण त्या सारंगीच्या लयबद्ध आवाजात ते इतके हरवून जात की, मी आल्याचे त्यांच्या लक्षात येत नसे” (संदर्भ- पहा, समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संपादन-संकलन : विजय सुरवाडे, पृ. १४६) बाबासाहेबांच्या याच संगीतप्रेमाविषयी अशीच एक आठवण सांगताना शां. शं रेगे लिहितात, “ १९५२-५३ साली आंबेडकरांना एकदा वाद्य शिकण्याची लहर आली. तत्पूर्वी कधी तरी येहुदी मेनुहीच्या आर्त वादनाची रेकॉर्ड त्यांनी ऐकली होती. पुष्कळदा थट्टेत ‘काँग्रेस जळत असताना मी नीरोप्रमाणे फिडल वाजवीत राहणार’ असे ते म्हणत असत. मुंबईला आल्यावर त्यांनी मला व्हायोलीन शिकवण्यासाठी मास्तर आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी चिखलवाडीत जाऊन बाळ साठ्यांना घेऊन आलो. पहिल्या दिवशी व्हायोलीन कसे धरावे, बोटे कुठे ठेवावी व बो कसा फिरवावा ह्याचे धडे त्यांनी घेतले. पण काही काळ कष्ट पडल्यानंतर हात दुखायला लागल्यावर शिकणे बंद झाले, पण साठ्यांचे वादन सुरु व्हायचे. काही वेळा व्हायोलीनमधून पक्ष्यांचे, पशूंचे, मोटारींचे आवाज साठे काढून दाखवीत आणि बाबासाहेब त्यांच्या ह्या कौशल्यावर खुश होत, ‘मला असे वाजवता येईल काय? किती दिवस लागतील?’ असे निष्पाप, बालिश प्रश्न ते विचारीत…..” बाबासाहेबांच्या संगीत प्रेमाविषयी त्यांचे पर्सनल सेक्रेटरी नानकचंद रत्तू लिहितात की, “उनके पास एक रेडिओग्राम था, जिसपार वह मुझसे बौद्ध ज्ञान के रीकॉर्ड बजवाते थे| उनके पास एच.एम.व्ही. (व्हीज मास्टर्स वोयस) कंपनी के ऐसे चार ग्रामोफोन रीकॉर्ड थे और ऊन पर उनका नाम छपा था| इसके अलावा उनके पास २०० ससे भी अधिक ऐसे ग्रामोफोन रीकॉर्ड थे, इन्हे वह फुर्सत के क्षणो मी सुना करते थे|” (संदर्भ-पहा, डॉ. आंबेडकर : कुछ अनछुए प्रसंग, लेखक- नानकचंद रत्तू, पृ. ६२) या सर्व संदर्भांवरून आपल्याला बाबासाहेबांच्या संगीतप्रेमाची कल्पना येते. आता पाहूयात बाबासाहेबांचे चित्रकलेविषयीचे प्रेम.
बाबासाहेबांना चित्रकलेचाही छंद होता. याबाबत शां. शं. रेगे लिहितात की, “चर्चिलचे ‘पेंटिंग एज अ पास्ट टाईम’ हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना चित्रकलेचा नाद लागला, थाकर कंपनीतून त्यासाठी ड्रोइंग बुक्स, स्केच बुक्स, खडूच्या-जलरंगाच्या पेट्या, रबर आणि चित्रकलेच्या अभ्यासाची मिळतील तेवढी विविध प्रकारची पुस्तके त्यांनी विकत घेतली आणि दिल्ली-मुंबईच्या वास्तव्यात दररोज वेळ काढून चित्रे काढण्यास व रंगवण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी चित्र काढलेल्या वह्या त्यांच्या संग्रहात आढळल्या त्यावरून त्यांच्या ह्या उत्तम कलाभ्यासाची जाणीव होते.” बाबासाहेबांनी १९४० साली ह. वि. देसाईंना दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रकलेविषयी बोलताना बाबासाहेब म्हणतात, “खरंच, माझ्याकडे चित्रे विकत घेण्याइतके पैसे नाहीत. नाहीतर पुस्तकांप्रमाणेच मी चित्रेही घेतली असती विकत! मला हिंदी चित्रकला जशी आवडते तशीच इटालियन चित्रकलाही आवडते! मी ऑक्सफर्ड येथे असताना माझ्याचबरोबर बेव्हन नावाचा एका सधन गृहस्थाचा भाऊ होता. त्याच्यामुळे बेव्हनची आणि माझी ओळख झाली. बेव्हन हा मोठा सधन व्यापारी होता. पण ब्रिटीश म्युझियमपेक्षाही त्याच्याजवळ मोठा चित्रसंग्रह होता. त्याने हजारो पौंड चित्रे खरेदी करण्यासाठी खर्च केले होते. पुढे बेव्हन अफरातफरीच्या आरोपात तुरुंगात गेला. पण माझा त्याच्याविषयीचा आदर मात्र कमी झाला नाही. याचे कारण त्याचा चित्रसंग्रह पाहिल्यामुळे माझ्या मनावर अनुकूल परिणाम झाला होता. त्यांच्या रसिकतेमुळे माझ्या मनात आदर निर्माण झाला होता.” (संदर्भ-पहा, दै. वृत्तरत्न सम्राट, संपादक : बबन कांबळे, पृ. ९)
बाबासाहेब वर्तमानपत्रातील व्यंगचित्रांचाही रसिकतेने आस्वाद घ्यायचे. २४ डिसेंबर १९३२ रोजी ‘जनता’ पत्रकासाठी लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, “ ६ डिसेंबरच्या मेंचेस्टर गार्डियन पत्रात झालेले व्यंगचित्र मोठे मजेदार व उदबोधक आहे. ह्या चित्रात हिंदुस्थानचे सध्याचे व्हाईसरॉय लॉर्ड विलिंगटन यांनी उपोषण केले असून ग्लानी येऊन ते कॉटवर निश्चेष्ट पडल्यासारखे दाखविले आहे. जवळच रेमसे मक्डोनाल्डचा एक निर्जीव पुतळा स्टुलावर ठेवलेला दाखविला असून दुसऱ्या बाजूला बऱ्याचशा अंतरावर गांधीजी चरख्यावर सूत काढीत बसलेले व बकरी जवळच रवंथ करीत कान टवकारून उभी असलेली दाखविली आहे. ब्रिटीश पार्लमेंटकडून मिळणाऱ्या राजकीय सुधारणांना ‘अस्पृश्य’ लेखून त्यांचा स्वीकार करण्यास गांधीजींना भाग पाडण्यासाठी व्हाईसरॉयसाहेब गांधींविरुद्ध हा उपवास करीत असल्याचा भावार्थ या व्यंगचित्रात चित्रकार मि. लो. यांनी रेखाटला आहे. गांधीजींचे सहकार्य संपादन केल्याशिवाय भावी राज्यघटना यशस्वी होणार नाही व म्हणून ब्रिटीश सरकारला गांधींची मनधरणी करून त्यांचे सहकार्य मिळविणे भाग पडेल, असे या चित्रातून दाखविले आहे” बाबासाहेबांची चित्रकलेविषयीसाठी असणारी चिकित्सक नजर आपल्याला या पत्रावरून लक्षात येते.
वरील सर्व संदर्भांचे सूक्ष्मपणे अवलोकन केले असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, बाबासाहेबांनी आपल्या संघर्षमय व झुंजार आयुष्यक्रमातही आपली रसिकता नष्ट होऊ दिली नाही. ते आयुष्याच्या अखेरपर्यंत अत्यंत रसिकतेने जगले.
सदर लेख लिहिण्यामागचा हेतू इतकाच आहे की बाबासाहेब काही दैवी पुरुष वगैरे नव्हते ते आपल्यासारखेच हाडा-मासाचे अंगात रक्त असलेले मनुष्य होते. त्यांनी त्यांच्या विद्याव्यासंगाच्या बळावर विद्यार्थीदशेत असताना दिवसाच्या २४ तासांपैकी १८-२१ तास अभ्यास करून विद्वत्तेची अमाप उंची ते गाठू शकले होते. म्हणून बाबासाहेबांना देव्हाऱ्यात ठेवून पूजण्यापेक्षा, त्यांच्या प्रतिमांवर निळे नाम लावण्यापेक्षा त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दिलेले विचार डोक्यात घालून स्वतःच्या व समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने सर्वस्व झोकून चळवळीत काम केले पाहिजे.
– प्रथमेश हणमंत हबळे
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
9359999193