आझाद हिंद राष्ट्र!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरच्या भूमीवरून आझाद हिंद राष्ट्राची घोषणा केली व स्वत:चे सरकारही स्थापन केले, त्या ओजस्वी व ऐतिहासिक घटनेला आज ७७ वर्षे झाली.

ब्रिटिश सत्तेने भारताला ‘स्वातंत्र्य’ देण्याच्या आधीच नेताजींनी स्वतंत्र राष्ट्राची द्वाही फिरवली. हे राष्ट्र औट घटकेचे-इन मिन दोन वर्षांचेच होते, हे खरे पण त्यामुळे ब्रिटिश सत्तेसमोर आव्हान उभे ठाकले, हेही वास्तव आहे.

जर्मनी, जपान यांचे दोस्त राष्ट्रांविरुद्ध महायुद्ध चालू असतानाच जपानच्या मदतीने नेताजींनी ‘अर्जी-ए-हुकुमत आझाद हिंद’ या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करून साऱ्या जगाला धक्का दिला. १८५७च्या लढ्यानंतर ब्रिटिश साम्राज्याला असे आव्हान कुणी दिले नव्हते.

नव्या देशाकडे स्वत:ची भूमी नव्हती. म्हणून जपानने त्यांच्या ताब्यात आलेली अंदमान, निकोबार बेटे दिली. पोर्ट ब्लेअर ही राजधानी घोषित करण्यात आली. तिथे तिरंगा फडकला व नेताजींनी ‘राष्ट्रप्रमुख’ म्हणून मानवंदनाही स्वीकारली.

जपान, जर्मनीचे साथी असलेल्या फिलिपाइन्स, क्रोशिया, इटली, थायलंड आदी सात देशांनी नेताजींच्या सरकारला मान्यता दिली. १९४३च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पूर्व आशिया परिषदेला ‘राष्ट्प्रमुख’ म्हणून नेताजी उपस्थित राहिले.

अंदमान-निकोबार द्विप समुहाचे नाव बदलून ते शहीद व स्वराज असे करण्यात आले.

हे सारे होत असले तरी ते सारेच क्षणभंगूर ठरले कारण युद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय होत गेला व जपानचा आधार तुटल्याने आझाद हिंद एकाकी पडले. त्यातच १८ ॲागस्ट १९४५ ला नेताजी गूढरित्या गायब झाले.

त्यांच्या जाण्याबरोबरच आझाद हिंदचे स्वप्नही उध्वस्त झाले. नेताजींचा हा क्रांतिकारक प्रयत्न तिथेच थिजला.

१५ ॲागस्ट १९४७ ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण ‘अर्जी-ए-हुकुमत आझाद हिंद’च्या खुणा मात्र पुसून टाकण्यात आल्या.

शहीद व स्वराज ही नेताजींनी बदललेली अंदमान, निकोबारची नावेही आपण राखली नाहीत. दरम्यान काॅंग्रेसची राजवट जाऊन मोरारजी देसाई, चरण सिंह,  इंद्र कुमार गुजराल,  देवेगौडा, अटल बिहारी वाजपेयी प्रभृतींची काॅंग्रेसेतर सरकारे आली व गेली. २०१४पासून नरेंद्र मोदी यांच्याकडे निर्णायक बहुमत आहे. पण अंदमान – निकोबारला स्वतंत्र भारतात अद्याप शहीद व स्वराज ही नावे अद्याप मिळालेली नाहीत.

तरीही नेताजींच्या या कर्तबगारीसमोर नमावेच लागेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!