आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करून टास्क फोर्सकडे पाठवा – मुख्यमंत्री

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


कोरोनावरील उपचाराबाबत विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांनी केली चर्चा

स्थैर्य, मुंबई, दि.२२ : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात जेणेकरून एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुष उपचारासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, निमा, आय एम ए, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आयुषच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी देखील राज्य शासनाने समिती नेमली आहे. उपचारांमध्ये सर्व पॅथी महत्त्वाच्या असून त्यातील औषधांसाठी सर्वांनी मिळून राज्य शासनाला दोन पानी मार्गदर्शक सूचना तयार करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

आयुष मधील औषधांची प्रतिबंधात्मक आणि उपचारासाठी अशा दोन भागात विभागणी करून तज्ज्ञांनी त्या संबंधी उहापोह करावा आणि टास्क फोर्सकडे सर्वसमावेशक सूचना सादर कराव्यात जेणे करून त्या कोरोना रुग्णांच्या उपचारात उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी सांगितले. या संकट काळात आर्युवेद, युनानी यांचे महत्त्व जगाला पटवून देण्याची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी विविध तज्ज्ञांनी आपले मते मांडली. बैठकीस निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, निमाचे मुंबई अध्यक्ष डॉ. संजय लोंढे, आयुर्वेदीक संघटनेचे डॉ. आशुतोष कुलकर्णी, युनानी कौन्सिलचे डॉ. खुर्शीद कादरी, होमिओपॅथी कौन्सिलचे डॉ. नितीन गावडे आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!