अष्टपैलू सायलीने रेखाटले भिंतीवर अप्रतिम निसर्गचित्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २३ : करोना महामारीचे संकट आले अन् लॉकडाउन अपरिहार्य ठरला. त्यामुळे गेले चार महिने गाव व शहरे ठप्प झाली. शाळा, महाविद्यालयांना कुलूप लागले. अभ्यास नाही म्हणजे परीक्षा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले छंद, कला जोपासण्याची संधी मिळाली. अशाच एका अष्टपैलू सायली राजे या इंजिनियर रंगकर्मीने मनातली कल्पना चक्क घरातल्या भिंतीवर रेखाटत अप्रतिम निसर्गचित्र रेखाटले आहे. विविध कला जोपासत असताना देशसेवा करण्याचे स्वप्न साध्य करण्यासाठी ती कठोर मेहनत घेत आहे.

कला ही उपजत असावी लागते. त्यामुळेच प्रत्येक कलावंत आपल्या प्रतिभेच्या जोरावर आकाशाला गवसणी घालत असतो. क्षेत्र कोणतेही असले तरी प्रतिभावंत अप्रतिम कलाकृती प्रत्यक्षात साकारत असतो. खटावची सायली राजे ही विविध कला अंगी जोपासत आजवर यशस्वी होत आली आहे.

सायली खर्‍या अर्थाने अष्टपैलू आहे. ती अगदी बालवयातच उत्तमपणे जलतरण शिकली आहे. विहिरीच्या बगाडावरून खोल पाण्यात ती झेपावत आली आहे. दुचाकीसह चारचाकी गाडीचे सारथ्य ही ती निष्णात चालकाप्रमाणे करत असते. मातीच्या आकर्षक गणेश मूर्ती ती फारच सफाईदारपणे साकारत असते. शिवाय त्या मूर्तींना साजेसा रंग देऊन चिखलातून देव घडवत असते. सायली फक्त या विविध कलांमध्येच पारंगत नाही. तिची अभ्यासातही फार गती आहे. कोणताही खासगी वर्ग न जाता तिने दहावीला तब्बल 93 टक्के गुण मिळविले होते. त्या गुणांच्या बळावरच तिला विद्येचे माहेरघर असणार्‍या कराड येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात निशुल्क प्रवेश मिळाला होता. पण आता कोरोनामुळे लॉकडाउन आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे फावल्या वेळात ती आपला चित्रकलेचा छंद जोपासत आहे.

सायलीला चित्रकलेची आवड आहे. तिने शाळेत एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकलेच्या परीक्षा दिल्या आहेत. तिने आपल्या घरातल्या भिंतीवर एक निसर्गचित्र कल्पकतेने चितारले आहे. 13 फूट लांब व 7 फूट उंचीचे हे अप्रतिम चित्र आहे. त्यात ऑईलपेंटचे रंग उधळले आहेत. सायलीची इच्छाशक्ती प्रबळ आहे. त्यामुळे ती चित्रकलेच्या माध्यमातून विविध कल्पना प्रत्यक्षात साकारत सप्तरंगाने नटलेल्या आपल्या आयुष्यातील ‘देश’ सेवेचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!