दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२१ । सातारा । पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी सातारा जिल्ह्यातील आंबा व डाळिंब फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये एच.डी.एफ.सी इर्गो या कंपनीमार्फत ही योजना राबवली जात असून या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी सातारा जिल्ह्यात आलेल्या कृषी रथाचे उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले.
या कार्यक्रमासाठी तंत्र अधिकारी संतोषकुमार बरकडे, एच.डी.एफ.सी. इर्गो विमा कंपनीचे सातारा जिल्हा व्यवस्थापन श्रीयुत जगताप, तालुका समन्वयक सुरज पवार, विजय कोरडे तसेच शेतकरी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाटण, कराड, कोरेगाव, माण, खटाव, खंडाळा व फलटण तालुक्यांमधील गावोगावी जाऊन प्रचार रथामार्फत या योजनेबाबत प्रचार प्रसिद्धी करणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी दिली. सध्या हवामानाची शाश्वती राहिलेली नसल्याने केव्हा जास्त पाऊस पडतो तर काही वेळा पावसामध्ये खंड पडतो. अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शासनाची ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले.