दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत हुमणी कीड व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून विडणी मंडळ मधील सासकल ता. फलटण येथे आयोजित मोहीमेमध्ये कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी अभियानाची माहिती देऊन किडीच्या प्रादुर्भावामुळे नवे संकट उभे राहत असताना त्याचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता व त्याची कार्यपद्धती शेतकऱ्यांना समजावून दिली व हुमणी कीड जीवनक्रम त्याचे एकात्मिक पद्धतीने आणि जैविक व रासायनिक पद्धतीने नियंत्रणबाबत तसेच लष्करी आळी नियंत्रण बाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी या पद्धतीने कीड नियंत्रण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
अश्या परिस्थितीत सासकल व परिसरातील शेताच्या कडेने असलेल्या कडुलिंबाच्या झाडावर त्याची कोवळी शेंड्याकडील पाने खाण्यासाठी हुमणीचे भुंगेरे दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी हुमणी नियंत्रण व्हॅट्सअँप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यावर आपल्या बंधावरील झाडावर हुमणी किडीचे भुंगेरे दिसताच माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर हुमणी किडीचे भुंगेरे दिसतील तेथे योग्य उपाययोजनाबाबत माहिती देण्याचे व्यवस्था करण्यात आली असल्याचे कृषि सहाय्यक सचिन जाधव यांनी सांगितले.
सासकल येथे संतोष फत्तेसिंग मुळीक यांच्या शेतातील झाडावर हुमणी चे भुंगेरे आढळून आल्यानंतर रात्रीच्या वेळी हे भुंगे काठीने खाली पाडून नष्ट करण्यात आल्याने त्याची एक पिढी नष्ट झाल्याने जीवनक्रम खंडीत होवून भविष्यात होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी मदत होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
हुमणीचे भुंगे नष्ट करण्यासाठी शेतातील बंधावर असलेल्या झाडाच्याखाली विजेचे प्रखर दिवे लावून प्रकाश सापळे तयार करावे. त्याखाली पाण्याने भरलेल्या टाकीत भुंगे पडल्याने नष्ट होतात. त्याचप्रमाणे हुमणीचे भुंगे पकडण्यासाठी एरंडी मिश्रित सापळा तयार करून तो शेतात ठेवण्याच्या पद्धतीबाबत तसेच रात्रीच्या वेळी कडुलिंब व बाभूळ झाडावरती हुमणी चे भुंगेरे आल्यानंतर त्यावरती कीटकनाशकांची फवारणीद्वारे नियंत्रण पद्धतीबाबत त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
हुमणी व अमेरिकन लष्करी आळी नियंत्रण माहिती देणारी घडीपत्रिका शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सासकल येथील शेतकरी रुपेश मनोहर मुळीक यांच्या शेतावर प्रकाश सापळे तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहीती कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी दिली.
कृषि विभागा मार्फत हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण व अमेरिकन लष्करी नियंत्रण मोहीम काम सुरू असल्याचे कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी सांगितले.