दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२३ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशोदा टेक्नीकल कॅम्पस, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 जून 2023 रोजी जागतिक सायकल दिन, जागतिक पर्यावरण दिन, अन्न सुरक्षा व मानक अधिनियम 2006 या विषयी जागरुकता शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्राध्यापक डॉ. मोहिते यांनी प्रास्ताविकात सायकल दिनाचे महत्व विशद करुन त्याबदद्लची सविस्तर माहिती दिली. ॲड. सुचिता पाटील, सहा. अभिरक्षक यांनी अन्न सुरक्षा व मानक अधिनियम 2006 या विषयी मार्गदर्शन करताना अन्न उत्पादन कर्ता व विक्रेता यांच्यासाठी असलेल्या नियमांची तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षांविषयी माहिती दिली. विविध उपहारगृहे, सार्वजनिक बाह्य अन्नपदार्थ विक्री व्यावसायिक यांच्या ठिकाणी काय काळजी घ्यावी याचीही माहिती दिली. मानद वन्यजीव रक्षक सुनिल भोईटे यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व विशद करून हा दिन वसुंधरा परिषदेमध्ये घेतलेल्या निर्णायमुळे सुरू केला असून त्या परिषदेच्या नियमानुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी देशाने घेतलेले निर्णय, बाजारपेठेवर झालेला परिमाण व अत्याधुनिक पर्यावरण पूरक असलेली यंत्रणा या विषयी माहिती दिली. तसेच जैविक साखळीवर पर्यावरणाचे होणारे परिणाम, निसर्ग आणि पर्यावरण यातील फरक, त्याचे संवर्धन याविषयी काय करावे लागते याचीही माहिती दिली.
अध्यक्षीय मार्गदर्शन कराताना 3 रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर एम.बी. पठाण यांनी जनजागृती शिबीर घेण्यामागील हेतू विशद करून अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास 84 विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. प्राधिकरणाच्या अध्यक्ष मंगला धोटे आणि सचिव तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.