दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
चौधरवाडी, ता. फलटण येथील पोलीस पाटील सौ. रसिका हेमंत भोसले यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे त्यांचे ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ म्हणून निवड करीत त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सन २०२२-२३ कालावधीत चौधरवाडीच्या पोलीस पाटील म्हणून केलेल्या प्रशंसनीय कामाबद्दल सातारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी जिंती, खुंटे तसेच फडतरवाडी अशा त्रिशंकू भागात विखुरलेल्या व बागायतदारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चौधरवाडी गावात पोलीस पाटील म्हणून काम करीत असताना सर्वांना बरोबर घेऊन अतिशय चांगले काम केल्याने सौ. रसिका भोसले यांना ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान, रसिका भोसले यांचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर मान्यवरांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.