दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२४ | फलटण |
मुंबई येथील रुद्रांश फौंडेशन मल्टिपर्पज सोसायटी व सिनेअर्क प्रॉडक्शन यांच्यावतीने विडणी येथील पत्रकार योगेश निकाळजे यांना यावर्षीचा ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
मुंबई येथील रुद्रांश फौंडेशन व सिनेअर्क प्रॉडक्शन यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक साहित्य, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी व योगदान असलेल्या मान्यवरांचा पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी विडणी, ता. फलटण येथील दैनिक पुढारीचे पत्रकार योगेश बापूराव निकाळजे यांना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोहोळ यांच्या शुभहस्ते व पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त युनुस पठाण, इंक्रेडिबल सोशल वर्कर्स ग्रुपचे अध्यक्ष अस्लम बागवान, ज्येष्ठ लेखिका सौ. शैलेजाताई मोहोळ, निसार फोंडेशनचे अध्यक्ष हाफिज शेख व रुद्रान्स फौंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४’ या पुरस्काराने स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
योगेश निकाळजे यांनी गेल्या २३ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात नि:पक्ष व निर्भिड पत्रकारिता केली असून आपल्या लेखनीतून आजपर्यंत अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली असून त्यांच्या या विविध कार्याची दखल घेऊनच रुद्रांश फौंडेशन मुंबई यांच्यावतीने यावर्षीचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य, कला, पत्रकारिता, समाजसेवा, व्यवसाय व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणार्या अनेक मान्यवरांना ‘महाराष्ट्र रत्न २०२४’ हा पुरस्कार मान्यवरांचा हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मराठी अभिनेत्री कोमल सावंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार इतिहास अभ्यासक जयदेव जाधव यांनी मानले.