स्वयंचलित गोष्टी उदयाला येण्यापूर्वी कागद पेन घेऊन शब्दबद्ध होत व्यक्त होणे खरे जिकीरीचे काम होते. त्यातही मनी आलेला मुद्दान्मुद्दा पकडून त्याला वाभरं होऊ न देता, आणि तो विसरण्यापूर्वी चपखल जागी बसवणे कर्मकठीण गोष्ट. डोक्यातल्या असंख्य कवीकल्पना जशाच्या तशा शिस्तीत उतरवणे आणि कुठलाही अर्थाचा अनर्थ होऊ न देता त्याला पेश करणे ह्याला मूर्तिमंत तल्लखपणा नसानसात भिनलेला असावा लागतो. ‘कटपेस्ट’ करत कळसाला पाया किंवा पायाला कळस करणे आता आपल्याला शक्य आहे. त्या काळी ही सोय उपलब्ध असती तर कदाचित डोकीकडून पायाकडे वाचताना एक व्यक्ती आणि पायाकडून डोक्याकडे वाचत जाल तर दुसरेच शब्दचित्र उमटलेले दिसले असते. म्हणून वाटते, आत्ताचा ‘व्हॉईसो टाईपो’ पु.लं.च्या वेळी अस्तित्वात असता तर काय मजा आली असती नाही. डोक्यात शब्द तरंग उठला रे उठला कि स्क्रीनवर उमटत गेलं असतं.! पर्यटनापाठी येऊन उरावर आदळणारे फोटो अल्बम, टॉमी, राघूसारखे पाळीव प्राणी, ऑटोमॅटिकतेचा सार्थ अभिमान असलेले स्वयंघोषित स्वयंचलित यांसोबतच असंख्य पात्रे, मिनिटागणिक खस खस पिकवू लागली असती. खरं सांगायचं तर पु.लं.नी स्वतःहून नारायणाचा ‘मॉडर्न ईव्हेंट मॅनेजर’ अवतार लागलीच रिलीज केला असता.
माझ्यासारख्या सखाराम गटण्याला राहून राहून पु.लं.ची ही पोकळी जाणवत आहे. पदोपदी पु.लं.च्या शत्रूपक्षात भर पाडण्यात सांप्रतकाळ पुरेसा पूरक आहे. घरी पाडलेली आणि दारी पाडलेली वीट घेऊन, होऊ घातलेला ऑटोमॅटिक विसर्ग, त्यावेळी जेवढा त्यांना पीडून गेला, अगदी तेवढा नसेल कदाचित पण त्या प्रकारच्याच ऑटोमॅटिक उंटाचा मुका घ्यायचा प्रसंग ह्या अलीकडच्या गुगलबाईच्या ऑटोमॅटिक कर्तुत्वामुळे सध्या गटण्यावर वारंवार गुदरत आहे. मयसभेतील आभासी स्थापत्यापाई कौरव आपटले नसतील एवढी आदळआपट वारंवार होत आहे. अशा वेळी डोक्यावर हात मारून घेत, तोंडातून अरे देवा बाहेर पडायचा अवकाश कि लागलीच, हि गुगलबाई, द्रौपदीसारखे दात काढून, ‘सॉरी डीडंट गेट यू, ट्राय स्पिकिंग प्रॉपरली’ म्हणत अजूनच गर्तेत ढकलत राहते. चार्लीचाप्लिनच्या एका सिनेमात कणीस खाण्यासाठी तयार केलेले एक अद्ययावत मशीन दाखवले होते. त्या मशीनचा ढिला झालेला एक पेच बिचार्या चार्लीला एका भयंकर पेचप्रसंगात घेऊन जातो. मक्याचे दाणे काढून झाल्यावर दातातोंडावर फिरणारा तो रोल थांबता थांबत नाही. अगदी तशीच परिस्थिती परवा माझ्यावर ओढवली, तेव्हा तर पु.लं. तुम्ही पाहिजेच होता राव हा एकच भाव मनी दाटला. त्या दिवशी ‘खुल जा सीम सीम’ केवळ गोष्टीपुरते मर्यादित नसून सध्याचा चालता बोलता जमाना त्याला कवेत घेऊन फिरत असल्याची जणू खात्रीच पटली.
‘एन्टीना’ फिरवून आणि टी.व्ही.च्या टाळूवर थपडा देऊन त्याला ठिकाणावर आणण्याच्या जमान्यातील आपण, म्हणजे हरणटोळच्या बिगरी ते म्याट्रिकवाले सरधोपट लोकं, नवीन ‘स्लिम अँड ट्रिम एक्स्ट्रा वाईड’ अशा वळणदार टीव्ही पुढ्यात अक्षशः गर्भगळीत होताना दिसतो.
परवा नीलदंत असलेल्या सूक्ष्मातीसूक्ष्म ‘चीप’ळ्यांपासून ते अशा कोट्यवधी ‘चीप’ळ्यां एकत्र चिपळून तयार झालेल्या अजस्त्र यंत्रमानवांच्या वसाहतीत राहायचा योग आला. योग आला म्हणण्यापेक्षा भोग भोगावा लागला. खट्ट आवाज झाल्याशिवाय बटण दाबल्याचे समाधान मिळत नसते, ही केवळ अंधश्रद्धा असल्याची पावती देणार्या एका सदनिकेपुढ्यात उभा होतो. त्या अजायब वसाहतीतील ऑटोमॅटिक सदनिकेत डोअरबेलचे बटण शोधण्यात बराच वेळ खर्ची पडल्यावर, हाताची दारालगतची पुसटशी हालचाल, अस्पष्टशी किणकिण आत घेऊन गेल्याचा भास झाला. डोळ्यांपुढ्यात छोटासा पडदा आला आणि बुबुळांचा एक फोटो घेऊन गेला आणि एका छोट्याशा क्लिक आवाजाने दार आपोआप सरकू लागले. सोबत पायाखालची जमीन आत जात असल्याचा भास झाला. जमिनीवरील एका चौकोनावर पायताणे आपोआप गळून पडली. पायातली ताकद गेली का काय? म्हणून वाकून बघू लागलो, तो पाण्याचे फवारे पायावर उडू लागले आणि पाठोपाठ सुस्वागतम चाळीसाव्या मजल्यावरील, चार हजार पाचशेव्या सदनिकेत तुमचे स्वागत आहे, असा ध्वनी कुठल्याशा भिंतीकडून आला.
कोणाय? आलो आलो!! किंवा, दार उघडंच आहे, या! कोण आहे? या! आत, असली काही सिस्टीमच नव्हती. ही भुताटकीने पछाडलेली वास्तू नसून हाच इथला शिरस्ता असावा, हे ध्यानात येण्याएवढी माझी पात्रता होती म्हणा! पण, एवढा आत येयून सुद्धा, एकही जिवंत माणूस काही, दृष्टीस पडत नव्हता, त्यामुळे पोटात थोडा गोळा आला. बहुतेक डोक्यात आलेली शंकासुद्धा, कुठल्याश्या गुप्तयंत्राने टिपली असावी. कारण खिशातला मोबाईल लागलीच वाजला, माझी अष्टभुजा इंजिनिअर बहीण स्क्रिनवर अवतरली. अरे दादा आम्ही पोचतोच आहे. तुझ्या आधार नंबरवरून तुझे बायोमेट्रिक्स अपलोड केलंय. आम्ही येईपर्यंत गुगल तुला काय हवं, नको ते पाहील. आलेच हं मी! असे म्हणून ती अंत:र्धान पावली. झालं! ‘चक्रव्यूह मे फस गया रे तू’ ची एक कळ पायापासून डोक्यापर्यंत चमकून गेली आणि मी हॉलमधे आपसूकच ओढला गेलो. मशीन गरम झालंय लगेच बंद करा. आवाज वेगळा येतोय स्वीच ऑफ करा. जळल्याचा वास येतोय खिडक्या उघड्या टाका असे रामबाण उपाय सोडले, तर यंत्रसामुग्री दोन हात दूरच बरी ह्या विचारांचा मी, आख्ख्या यंत्रांच्या आगारात, आणि तो ही एकटा!! या विचारापाठी दरदरून घाम फुटला तर आपोआप एसी चालू झाला. झालं कल्याण! म्हणजे मनात विचार आणायची सुद्धा चोरी वाटायला लगली.
उगा कुठून एखादा हात यायचा आणि पँट काढू पाहायचा. कंबरेची पँट होता होईल तेवढी घट्ट पकडून मनात आलेला कपडे बदलण्याचा विचार मी झटकून टाकला. सोफ्यावर बसावं की, आहे तिथेच वाट पहात उभे रहावे या विचारात मी मनाला गुंतवून ठेवले, जेणेकरून दुसरे कुठले विचार येऊच नाहीत. खरं तर प्रवासापाठी धावणारा नेचरकॉल केव्हाचा शरीराचे दार ठोठावत होता. पण मी हिम्मतच हरवून बसलो होतो. एकतर जाण्यासदृश जागेचा अभाव दिसत होता आणि एकूणच ऑटोमॅटिक साफसफाईची मी धास्तीच घेतली होती. तनामनाची कवाडे घट्ट बंद ठेवून, मनात राम नाम घेत, मी बहीण यायची आतुरतेने वाट पाहू लागलो. नको ती गडबड होण्यापूर्वी ‘दादा’ची हाक कानावर पडली खरी, पण मय सभेचा विषय असल्याने, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यावर बहीण आल्याची खात्री झाली. बाकी सगळं जाऊ दे आधी वॉशरूम उघडून दे, असे म्हणत मी तिचे स्वागत केले. वॉशरूममधला वावर,,,,,,,,,केवळ अवर्णनीय या सदरातच टाकून, एकदाचा मोकळा झालो, आणि बाहेर आलो. आपलं माणूस आल्यावर किती हायसं वाटतं नाही! गप्पागोष्टी, चहापाणी, जेवणखाणं, यामधे लहानपणीचा येणारा आपलेपणा, मधूनअधून होणार्या ऑटोमॅटिक आघातापाई, वेगवेगळ्या अभ्यास वर्गातून फिरत राहिला.
एवढं काय रे दादा, हे गुगल!! म्हणायचे आणि काय पाहिजे ते करून घ्यायचे. आपल्या सोईसाठी तर आहे हे सगळं! सारखी वाक्य दर पाच-दहा मिनिटांनी ऐकून घेत घेत आपले मागासलेपण झाकायचा प्रयत्न चालू होता. चावत नाही असं कितीही ठासून ऐकलं तरी अपरिचित कुत्र्याची भीती वाटतेच की! फास्टयुगाच्या सुरस आणि रम्य कथा ऐकत ऐकत, रात्र कधी झाली ते कळेलच नाही. सबंध दिवसात पहिल्यांदाच चक्क जिवंत माणसाने म्हणजे, आम्ही सगळ्यांनी मिळून अंथरुण पांघरुण प्रकरण हाताळले. थोडे अंग मोकळे झाल्यासारखे वाटले. आपसूक हात खिडकी उघडायला गेला तर आभासी उघड्या खिडकीत चंद्र दिसत होता. दादा! चंद्रकोर का, ‘फुल्ल मून’ हवाय झोपताना? असा रिमोटधारी दाजींचा प्रश्न झेलला! आता अवाक व्ह्यायचा पण कंटाळा आलाय बरका! मी रितसर हत्यार म्यान केले. मी झोपल्यावर ‘कुठल्याशा भिंतीत गडप होणार नाही नां’सारख्या भाबड्या प्रश्नांनी भाचराच्या नजरेत पडूनही झाले. आपलं आपलं झोपायचं असतं, हे कळल्यावर भारी बरं वाटलं. घोरण्याचा गुगलबाईला त्रास तर होणार नाही ना, हा प्रश्न तरी डोक्यात घुटमळलाच. आख्ख्या भिंतीवर एकही बटण नाही. टी. व्ही ज्या बाजूला तोंड करू, त्या बाजूच्या सरफेसवर प्रक्षेपित, डोळे उघडले की प्रकाश, बंद केले की अंधार यासारख्या लीला दिवसभर अनुभवल्यामुळे बाबापुता करून भाचराला झोप लागेपर्यंत सोबतीला घेतले.
त्यालाही मामाचा पुरता मामा करायची ऐतीच संधी आल्याने तोही ‘खुशी खुशी’ तयार झाला. सगळ्या गोष्टींचे टाईम सेट करून, कानाडोळ्याला विचित्र झापडं लेऊन, ते पिल्लू झोपी गेलं. हे निद्रे! हे निद्रादेवी! सगळे प्रकार करूनही, मला मात्र निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती. जरा चुळबूळ झाली, तरी दिवे तेवू लागत होते. त्यामुळे हालचालींवर मर्यादा पडत होती. तळमळत रात्र काढणे ते हेच असावे! टाईमरने आपले काम चोख बजावले. ए.सी. आपसूक बंद झाला. खिडक्या उघडायला जावे तर ऑटोमॅटिक चंदामामा मामाच्या राखणीला बसलेला. पंखा लावावा तर कुठल्याच भिंतीवर कसलेच बटण दिसेना. अगदी ऑटोमॅटिक पंचाईत होऊन बसलेली.
‘टाळ्या वाजवल्या की लाईट लागतील, बेसिन पुढ्यात हात नेला की पाणी येईल, जमिनीवर पाय ठेवले की आमूक होईल, काखेला हात लावला की तमूक होईल’ अशा सार्या शिकवलेल्या गोष्टींची उजळणी झाली. पण, पंखा चालू कसा करायचा हा आउट ऑफ सीलॅबस प्रश्न पडल्याने आता गुरुंचे पाय धरण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. हे ‘गुगल पुट ऑन लिव्हिंग रूम फॅन’च्या अर्जवावर गुगलीणबाई दरवेळी नवनवीन गुगल्या टाकत राहिली. वेगवेगळी उत्तरं देत होती, पण पट्ठीपंख्याची पाती काही फिरवेना झाली. शेवटी माझ्या धडपडीने लेकरालाच जाग आली. ए मामा झोप बरं. पंख्याला, गुगल नाही लाऊ शकत, त्याचा रिमोट माझ्याकडे आहे. घे, लावला! आता गप झोप, असे म्हणून चक्क माणसासारखी कूस बदलून आणि मला तळमळत ठेवून तो पुन्हा गाढ झोपी गेला.
बघा आता, आकाशीच्या सॅटेलाईटशी आणि देवाशी, एकाचवेळी कनेक्ट होऊ पाहण्र्या, या दोन पिढ्या नक्कीच पु.लंसाठी बर्यापैकी खाद्य ठरले असते का नाही? पु.लं. प्रेमींनो तुम्हीच ठरवा…!
– एम.बी.
१७ सप्टेंबर २०२४